पुणे(प्रतिनिधि)—चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेले शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु, शिवसेना नेते असे सचिन अहिर यांनी सांगितले.
एकीकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर हेदेखील उद्या राहुल कलाटेंची भेट घेणार आहे. मात्र जर निवडणूक झाली तर मी निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका राहुल कलाटेंनी घेतली आहे. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी दिली त्यामुळे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी सध्या महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहे.
राहुल कलाटे यांनी बंडखोरी करु नये आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि अजित पवारांनी देखील राहुल कलाटेंची भेट घेतली आहे. मात्र आता उद्या शिवसेनेचे सचिन अहिर यांची भेट घेतल्यावर अर्ज मागे घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सचिन राहुल कलाटे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने कलाटे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उद्या पोटनिवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांना खास संदेश पाठवल्याचे समजते. याविषयी माहिती देताना सचिन अहिर यांनी म्हटले की, राहुल कलाटे पूर्वी आमच्या पक्षाचे गटनेते राहिले होते. त्यामुळे त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. राहुल कलाटे यांचं वय पाहता त्यांचं राजकीय भविष्य चांगलं आहे, त्यांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. शेवटी अपक्ष लढण्याला काही मर्यादा असतात. गेल्यावेळी त्यांना चांगली मतं पडली होती. पण त्यावेळी कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिपचा पाठिंबा होता, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बुधवारी रात्री मी स्वत: राहुल कलाटे यांना निरोप दिला आहे. आज उद्धव ठाकरे स्वत:ही राहुल कलाटे यांच्याशी फोनवरुन बोलू शकतात. राहुल कलाटे यांनी मविआला मदत करावी, हाच आमचा प्रयत्न राहील, असे सचिन अहिर म्हणाले.