नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर कर्नाटकच्या दौऱ्यावर असणारे राहुल गांधी त्वरित दिल्लीला परतले. दरम्यान, एकूण ईडीच्या हालचाली बघता कर्नाटकातून येताच राहुल गांधीना अटक होणार अशी संशयाची पाल काँग्रेस नेत्यांच्याही मनात चुकचुकली मात्र, सध्या तरी तसे काहीही झाले नाही. पुढील दोन आठवड्यात ‘हर घर तिरंगांची’ मोहीम शिगेला पोहोचलेली असेल. या मोहिमेच्या निमित्ताने भारतीय नागरिकांच्या मनात राष्ट्रवादाची लाट निर्माण झालेली असेल. अशा राष्ट्रवादाने देश भारावलेला असतानाच नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी तुरुंगात जाऊ शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई आणि तिरंगा यात्रा या दोन्हींचा एकमेकांशी संबंध आहे असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी तुरुंगात जाऊ शकतात, असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या खटल्याच्या आधारेच कॉँग्रेस नेत्यांची चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे तुरुंगात जाऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे . त्यांच्या अटकेसाठी ईडीकडे ठोस कारणे आणि पुरेसे पुरावे आहेत.
खर्गे आणि बन्सल यांचीही झाली चौकशी
राजकीय जाणकारांच्या मते भाजपला तिरंगा यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादाची लाट आणायची आहे. खरेतर सध्या कुठलीही निवडणूक नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपसाठी ‘2024’ सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात थोडं मागे वळून पाहिलं तर मालिकाच पाहायला मिळते. गेल्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस नेते पवन बन्सल अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी तरतुदींनुसार त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. नॅशनल हेराल्ड ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते, तर त्याची मालकी ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ च्या हातात आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’चे सीईओ आहेत. पवन बन्सल यांनी एजेएलचे व्यवस्थापकीय संचालक असण्यासोबतच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम कोषाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
विधाने जुळत नसल्यास अटक शक्य
या दोन नेत्यांची चौकशी केल्यानंतर ईडीने राहुल गांधींना समन्स बजावले होते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीचे अधिकारी म्हणतात की सहसा प्रत्येक प्रकरणात अटक होते, असे नाही. प्रथम मालमत्ता संलग्न केली जाते. जर एखाद्या व्यक्तीने तपासात सहकार्य केले नाही किंवा त्याचे म्हणणे तपास यंत्रणेकडे असलेल्या ठोस पुराव्याशी जुळत नसेल तर त्याला अटक केली जाऊ शकते. यामध्ये तपास यंत्रणेची बाजू अशी आहे की, संबंधित व्यक्ती तपासात सहकार्य करत नसेल आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करत असेल, तर त्याला रिमांडवर चौकशी केली जाते. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना सुरुवातीपासूनच असे वाटते आहे कधी ना कधी कॉँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात जावे लागेल.
काय असू शकतो तिरंगा यात्रेचा आणि राहुल गांधी—सोनिया गांधी यांच्या अटकेचा संबंध?
तिरंगा यात्रेत भाजपकडून राष्ट्रवादाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी जीव ओतून काम करत आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीही आपापल्या राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम पुढे नेत आहेत. हा कार्यक्रम शिगेला पोहोचल्यावर ईडी काँग्रेस नेत्यांना अटक करू शकते. राष्ट्रवादाच्या या वातावरणाने देश भारावलेला असताना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक झाली तर इतर वेळी त्यांच्या अटकेला जेवढा विरोध होईल तेवढा विरोध या काळात होणार नाही असा भाजपचा अटकाव असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे आणि कुठेतरी काँग्रेस नेत्यांनाही याची जाणीव आहे.
गुरुवारी राहुल गांधी म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींना घाबरत नाही. त्यांना जे करायचे ते करा. संविधानाच्या रक्षणासाठी लढा देणे हे आमचे काम आहे. देशाच्या सन्मानासाठी ही लढाई सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर राहुल गांधी म्हणाले, आता सत्याग्रह नाही तर लढाई होणार आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, देशाचा कायदा सर्वांसाठी एक आहे. तो काँग्रेस अध्यक्ष किंवा काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसाठी बदलू शकत नाहीत. संबित पात्रा त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट संकेत देत होते. पात्रा म्हणाले, त्यांना भारताच्या कायद्याशी संघर्ष करायचा आहे. ना त्यांना कायद्याच्या विरोधात लढू दिले जाणार ना पळून जाऊ दिले जाणार,