पुणे–जे पळून गेले त्यांचे बहाणे काहीही असतील परंतु, यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने पहिल्या आपल्या गौरया स्मशानात रचून याव्यात असे आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव न घेता दिले आहे. भाजपच राजकारण शिखंडीच्या मागून सुरू आहे आणि ते स्वत:ही शिखंडी बनले आहेत. भाजपच राजकारण इतक्या दळभद्री पद्धतीने सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या स्तरावरचे राजकारण या महाराष्ट्रात कधीच झाल नव्हतं ,अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केली.
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणारच, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी केल्याने गेले दोन दिवस मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक एकमेकांसमोर ठाकले होते. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावंच, असं प्रतिआव्हान शिवसेनेने दिलं होतं. मात्र, राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून मातोश्रीवर जाणार नसल्याचे जाहीर केले. संजय राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली.
राऊत म्हणाले, मातोश्रीची रेकी करण्याचा काल प्रयत्न केला. आतमध्ये त्यांना काही कारस्थान करायच होत. मग शिवसैनिक संतापले, चिडले आणि चाल करून गेले. त्यामुळे तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो आमच्या स्वाभिमानचा प्रश्न आहे.
यापुढे असा प्रसंग परत घडला तर पुन्हा पुन्हा चाल करून जाऊ हे लक्षात घ्या. सत्ता असेल नसेल आम्हाला परवा नाही. तुमचा जीव तडफडतोय सत्तेसाठी, आमचा नाही. तुम्ही गटांगळ्या खात आहात, आम्ही नाही. या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायच ,गोंधळ निर्माण करायचा, अराजक निर्माण करायच. स्वत:ची हिम्मत नाही पुढे येऊन लढण्याची म्हणून शिखंडींना पुढे करायचे आणि त्यांच्या आडून आमच्यावरती हल्ले करायचे हे जर असच चालणार असेल तर त्या शिखंडींच्या आड जे लपून हल्ले करता आहेत त्यांचा लक्षभेद केला जाईल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. महाभारत नव्याने घडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील आणि यापुढेसुद्धा आम्ही सत्तेत राहू हे महाराष्ट्रात गोंधळ घालणाऱ्यांनी लक्षात ठेवाव असे ते म्हणाले.
या महाराष्ट्रात हे जे उपटसुंभ जे उपटलेले आहेत, उपरे ज्यांचा भाजपशी संबंध नाही, त्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही त्यांना हाताशी पकडून संध्याच भाजपच नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांचा पुचाटपणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अशी खूप आव्हाने शिवसेनेनी स्वीकारली आणि परतून लावली. किंबहुना आव्हानांच्या छताडावरती उभे राहून शिवसेना महाराष्ट्रात आणि देशात ५० वर्षांपेक्षा अधिक काळ उभी आहे, असे ते म्हणाले.
कोणी काही म्हणत असले आणि कितीही हवेतले फुसके बार सोडत असले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही पळपुटे आहात प्रत्येक वेळेला तुम्हाला पळून जाव लागल. परंतु , यंनिमिताने शिवसेना कुठे आहे असे विचारणाऱ्यांना शिवसेना मुंबईतही दिसली, महाराष्ट्रात दिसते आहे आणि नागपुरातही दिसली, असे ते म्हणाले.
यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागलं तर त्याने पहिल्या आपल्या गौरया स्मशानात रचून याव्यात असे मी पुन्हा म्हणतो, कारण हा संताप आहे, राग आहे. जे बोलतो त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे असेही त्यांनी नमूद केले.
आणि जर ही धमकी वाटत असेल असेल तर गेल्या दोन दिवसांपासून मातोश्रीची रेकी करून धमक्या सुरू होत्या त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका
आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका ,शिवसेनेला राष्ट्रपती राजवतीचे नियम शिकऊ नका. आम्हाला राष्ट्रपति राजवट कधी आणि का लावली जाते हे चांगले माहिती आहे. कोणत्या परिस्थित लावली जाते आणि कोणत्या परिस्थितीत उठवली जाते हेही चांगले माहिती आहे असे सांगत पहाटे चार वाजता राजभवन उघडून शपथ घेऊन मग राष्ट्रपती राजवट उठवणारे कारस्थानी लोकही या महाराष्ट्राने पाहिले आहेत असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रपती राजवटीचे नियम आणि कायदे राजभवनात बसलेल्या राज्यपालांना जावून सांगा अनेक घटनात्मक फायलींवर अडीच वर्षांपासून ते बसून आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
जातीच्या बोगस सर्टिफिकेटचा उपयोग करून जी व्यक्ति लोकसभेची निवडणूक लढते, ज्या बोगस सर्टिफिकेटला उच्च न्यायालयाने सुद्धा शिक्का मारला आहे की हे सर्टिफिकेट बोगस आहे. उच्च नायलयात खटला हरले आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. अशा बोगस सर्टिफिकेटवर निवडून आलेल्या खासदारांना आम्हाला नितीमत्तेच्या गोष्टी शिकऊ नये. या महाराष्ट्रात ढोंग आणि पाप , खोटेपणा याला थारा नाही, असा टोला त्यांनी नवनीत राणा यांचे नाव न घेता लगावला.
बोगस सर्टिफिकेटवायले जे खासदार आहेत त्यांना मला आव्हान आहे पुन्हा लोकसभा निवडणूक येईल तेव्हा निवडून येऊन दाखवा. अमरावतीला आम्ही सगळे जाणार पाहतो अमरावती शिवसेनेचा आहे की आणखी कोणाचा आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. जे पळून गेले त्यांचे बहाणे काहीही असतील पण यापुढे मातोश्रीच्या नादाला कोणी लागल तर त्याने आपल्या गौरया स्मशानात रचून याव्यात असे ते म्हणाले.
भाजपच राजकारण शिखंडीच्या मागून सुरू आहे आणि ते स्वत:ही शिखंडी बनले आहेत. भाजपच राजकारण इतक्या दळभद्री पद्धतीने सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या स्तरावरचे राजकारण या शिखंडी पद्धतीचे राजकारण या महाराष्ट्रात कधीच झाल नव्हतं अगदी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून नाही. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक युद्ध झाले, संघर्ष झाले ,जय पराजय झाले पण अशा प्रकारचे कोत्या मनाचं, शिखंडी पद्धतीच राजकारण म्हणजे महाभरतातल्या शिखंडीलाही लाजवणारे राजकारण महाराष्ट्राची बेअब्रू करणारे राजकारण कधी झालं नाही. असे ते म्हणाले.
कोणाच्या जिवावर तुम्ही हे करत आहात सीबीआय आणि ईडीच्या जिवावर? करा काय हव ते करा असे आव्हानही राऊत यांनी दिले. आम्ही (शिवसैनिक) जन्मताच माजुर्डे आहोत. आमचा माज काय आहे हे तुम्ही पाहिलं यापुढेपण दाखवू. आम्हाला पोलिसांची गरज नाही . आयुष्यभर आम्ही पोलिसांशी संघर्ष करताच काम करतो आहोत. आजही जी लढाई करतो आहोत ती पोलिसांच्या बळावर नाही. आमच्यात माज आहे तो शिवसेनेचा माज आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मनगटात ठासून भरलेला आहे. तो माज असाच राहील.
श्रीरामाच नाव घ्यायला राणे दांपत्याने विरोध केला होता आता तेच हनुमान चालीसा पठणाची नौटंकी करत आहेत. शिवसेनेच्या संयमांचा अंत पाहू नका असेही ते म्हणाले.