समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे-सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे-समाजाचा प्रत्येक अंग आज स्वस्थ नाही. त्यामुळे समाजाचे प्रत्येक अंग स्वस्थ बनून समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

हडपसरमधील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या डॉ. दादा गुजर माता बाल रुग्णालयाचे उदघाटन डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती आणि भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी, त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. पाटील, उपाध्यक्ष सतीश आगरवाल, सचिव अनिल गुजर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्राच्या आयुष मंत्रालयाच्या अनुदानातून डॉ. दादा गुजर माता बाल रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

सशक्त समाजनिर्मितीच्या गरजेवर डॉ. मोहनजी भागवत यांनी भर दिला. जगाला आपल्याकडून काही मिळाले पाहिजे. ते देण्याची आपली क्षमता आहे. सबल व सशक्त देश म्हणून आपण उभे राहू शकतो. त्यासाठी समाजात आपलेपणाची, स्नेहलिप्त कार्याच्या भावनेच्या अभिव्यक्तीची गरज आहे. समाजातील प्रत्येक अंग आज स्वस्थ नाही. ते स्वस्थ बनून समाज सशक्त होण्यासाठी अशा स्नेहलिप्त कार्यास बळ देणे गरजेचे आहे. असे कार्य समाजाने सक्षम केले पाहिजे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

सहज व परवडणाऱ्या दरात उपचार मिळणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आयुर्वेद, अँलोपॅथी, होमिओपँथी अशा विविध चिकित्सा पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेल्या, तर सुलभ व परवडणाऱ्या दरात उपचार मिळणे शक्य होईल. सध्या उपचारांवर मोठा खर्च करावा लागतो. त्याचा ताण रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांवर येतो. आयुर्वेदात याचाही विचार झालेला आहे. आयुर्वेदात इलनेसबरोबरच वेलनेसचाही विचार आहे. त्यामुळे अशा विविध शाखांना बळ दिले जाणे गरजेचे आहे, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.

बाबा कल्याणी, डॉ. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पप्रकल्पप्रमुख डॉ. सुशीलकुमार देशमुख व प्रकल्प समन्वयक डॉ. प्रणिता जोशी देशमुख यांनी रुग्णालयाबाबतची माहिती दिली. यावेळी आर्किटेक्ट दिलीप काळे, कंत्राटदार श्री. व सौ. राजन वडकर यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल गुजर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. समीर पवार यांनी आभार मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *