सर्व सामान्य महिलांच्या नित्य जीवनात येणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना आपले मानून त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अनेक महिला आपल्या आसपास असतात. त्यांच्या कामातून आपल्याला त्यांचे वेगळेपण, धडपड, समाजाप्रती आस्था जाणवते. अशाच एका सामान्य महिलेने हजारो महिलांना प्रशिक्षण आणि विश्वास देत स्वतःच्या पायावर उभे करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. तिचे कामच तिची महत्वाकांक्षा आहे. सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाअंतर्गत महिलाविषयक कामाचा विडा उचललेल्या स्वाती सुशील शिंदे यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात….
मी विश्रांतवाडी येथे राहते. माझे शिक्षण इयत्ता बारावी पर्यंत झालेले असून माझ्या घरात माझे पती, एक मुलगी, एक मुलगा व सासू असा परीवार आहे. माझे माहेर देखील विश्रांतवाडी मध्येच आहे. मला लहानपणापासूनच सामाजिक कामाची आवड होती. माहेरी असताना महानगर पालिकेचे नगरवस्तीचे बाल संस्कार केंद्राचे काम केले होते. लहान मुलांना एकत्र करणे, गाणी गोष्टी सांगणे, पालकांना संपर्क करणे अशी कामे करत या कामातून वस्त्या वस्त्यात फिरणे महिला व मुलींना संपर्क करणे यातून खूप आत्मिक समाधान मिळत असायचे. परंतु बारावीनंतर लगेच लग्न झाल्याने मला या कामात योगदान देता आले नाही, माझ्या सोबतच्या काही मैत्रिणी अनेक संस्थांसोबत काम करत असताना मी पाहायचे तेव्हा माझ्याही मनात नेहमी खंत वाटायची की मला संस्थे सोबत काम करता यावे, परंतु लग्नानंतर घराची जबाबदारी, नंतर मुलांची जबाबदारी, अशातच सासऱ्यांचे अचानक निधन अशा अनेक जबाबदाऱ्या मी सांभाळत होते.
आणि एक दिवस अचानक मला सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या महिला सहलीला जाण्याचा योग आला, सहलीला गेल्या नंतर मला संस्थेची माहिती मिळाली, संस्थेचे बचत गट, महिला शिबिरे अभ्यासिका किशोरी वर्ग यांविषयी मला अनेक उपक्रम समजले त्यानंतर मी सुराज्य संस्थे अंतर्गत ११२ या वस्तीत उन्नती बचत गटाची सुरुवात केली. हळूहळू मी सुराज्य संस्थेत माझा वेळ घर सांभाळून देऊ लागले आणि आता मी पूर्ण वेळ संस्थेचे काम करत आहे.
विश्रांतवाडी विभागातील महिला उद्योग व प्रशिक्षण विभागाचे सर्व काम अगदी मनापासून करते. ३ वर्षात माझा पाचशेच्या वर महिलांना घरोघरी जाऊन संपर्क झाला, त्यांना प्रशिक्षण व उद्योगासाठी बळ देण्याचे काम उत्साहाने करताना मला समाजात कधी मान सन्मान मिळायला लागला हे कळले देखील नाही. सुरुवातीला घर सांभाळून काम करताना थोडेसे घरात वाद होई परंतु आज माझे पूर्ण कुटुंब मल या कामात मदत करते.
कोरोना काळात मार्च २०२० मध्ये खूप भयानक परिस्थितीतही मी कामात पूर्ण वेळ दिला आमच्या महिलांना १५ हजार मास्क ची ऑर्डर मिळाली, त्यावेळी महिलाना घरोघरी जाऊन कापड पोहोच करणे, मास्क जमा करणे, त्याचे वाटप करणे यातून महिलांना खूप मदत करता आली, एके दिवशी एका महिलेला मास्क चे पैसे द्यायला गेल्या नंतर समजले की त्या घरात आजच्या जेवणाला देखील काही नव्हते, अशावेळी आपण दिलेल्या रोजगाराच्या पैशातून त्या महिलेच्या डोळ्यातील अश्रू आजही मला आठवतात त्याच वेळी मी ठरवले, या महिलांच्या रोजगारासाठी अजून प्रयत्न करायचे.
आज संस्थेअंतर्गत जवळ जवळ आठशे ते नऊशे महिलांना केक, चॉकलेट आईस्क्रीम शिवणकाम, पिशव्या तयार करणे , मास्क, बिर्याणी, अशी अनेक प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम बनविले. ज्या वस्तीतील मुलीना घराच्या बाहेर देखील पाठवीत नसत त्यांना आज माझ्यावरच्या विश्वासाने संस्थेच्या शिबिरे व सहलीसाठी हक्काने पाठवितात.
मला अजूनही समाजासाठी जे जे शक्य असेल ते मी नक्की करेल, हे सर्व करत असताना मला अनेकदा निराशा आली असेल अशा प्रत्येक वेळी मा. विजय शिवले सर, डॉ.सुनंदा ताई व सविता ताई यांनी नेहमी समजून घेत सांभाळून घेतले. मला नेहमी प्रेरणा दिली. कोरोना योद्धा म्हणून माझा सत्कारही केला त्यामुळे मला या कामात अजून उत्साह मिळाला. मला या कामातून मिळणारे समाधान कोटीच्या पैशात देखील मोजता येणार नाही यासाठी मी सुराज्य संस्थेचे कधीही ऋण फेडू शकत नाही.
स्वाती सुशील शिंदे
सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प