जडणघडण होत इथे घडतो माणूस..

महाराष्ट्र लेख
Spread the love

‘टीएमएनपी ट्रायबल मेन्सा नर्चरींग प्रोग्रॅम हा प्रकल्प ( आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प )आदिवासी व ग्रामीण भागांतील वंचित, बुद्धिमान मुलांसाठी  २००२ मध्ये  सुरु झाला. वंचित पण बुद्धिमान, मुलांना बुद्धिमत्तेची जाणीव करून देणे आणि  देश हितासाठी नेतृत्व तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच हा प्रकल्प पुर्णतः अशैक्षणिक असून भारतीय संस्कृतीवर  आधारित आहे. मी या प्रकल्पाची लाभार्थी असताना कार्यशाळांमध्ये सहभागी झाले, यातून ‘स्व’ सोबतच आपण समाजासाठीही काम करू शकतो व ते करायला हवे याचे बाळकडू मिळाले. या कार्यशाळांच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढलाच आणि  त्याबरोबर विचारांत परिपक्वता येण्यास सुरवात झाली.  अशैक्षणिक पण  जीवनाचे धडे देणाऱ्या  समाजोपयोगी  आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्पात समन्वयक म्हणुन कार्य करणाऱ्या चिन्मयी कुलकर्णी यांचा अनुभव  आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याच शब्दात…..

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

गदिमांच्या या कवितेप्रमाणेच कुरूप वेडया पिल्लापासुन राजहंस असण्याची जाणीव होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे संवर्धन, स्वतःची ओळख, बुद्धिमत्ता, क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी संवर्धन गरजेचे आहे. आदिवासी बुद्धिमता संवर्धन प्रकल्पामुळे  (TMNP – Tribal Mensa Nurturing Program)  मला ते योग्य वेळेत मिळाले. बुद्धिमत्ता ही मला मिळालेली  देणगी आहे व ती मी इतरांसाठीही वापक शकते, हे संस्कार या संवर्धनात झाले. मग स्वतःबरोबरच इतरांसाठी का  तिचा वापर करायचा नाही या विचाराने मी  त्या संस्थेच्या टीमचा भाग झाले.  पुणे आणि  परिसरातील शाळांत कार्यशाळांसाठी जाऊ लागले.त्याचवेळी हे संवर्धन थोडं पुढे जाऊन आपल्या भागातील मुलांपर्यंत पोहचवता येईल का? किंवा कसे पोहचवता येईल याचा सातत्याने मनात विचार होता.   वास्तवता मी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना  तिथे एक मुल्यांकन चाचणी आदिवासी बुद्धिमता संवर्धन प्रकल्पाद्वारे घेतली होती. त्यात मला उत्तम मार्क मिळाले आणि माझातील कस्तुरी मृगाला संधी चालून आली. 2017-18 मध्ये टी. एम एन पी द्वारे   घेतलेल्या बुद्ध्यांक चाचणमध्ये  माझी गिफ्टेड म्हणून निवड झाली. त्यानंतर मी सर्व कार्यशाळांत सहभागी झाले. तसेच tmnp तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध  मुल्यांकन चाचण्या  दिल्या.

पुढे 2019 साली  टी. एम एन पी. तर्फेच मला  क्रोएशिया, युरोप मधे आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादर करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर माझ्या विषयातील तज्ञांचे जाळे माझ्यासाठी खुले झाले. अशा  प्रकारे मला टी. एम एन पी. चा लाभ झाला.

कोविडच्या काळात गावी परत आल्यावर त्याकडे संधी म्हणून बघत आदिवासी बुद्धिमता संवर्धन प्रकल्पातर्फे एक उपक्रम  सांगली, सातारा या भागातील विदयार्थ्यासाठी करण्याचा विचार केला. त्या पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष शाळा निवडणे. त्यासाठी जिथे आपले प्राथमिक शिक्षण झाले तेथूनच  त्या संस्थेपासून सुरवात करण्याचे निश्चित केले, त्याद्वारे  नरसिंह प्रकल्प सुरु झाला. हा प्रकल्प सन २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षात सुरू झाला आहे. याप्रकल्पाअंतर्गत आश्रम शाळा शेरे, कृष्णा विद्यालय बोरे (जि.सातारा), आश्रम शाळा इस्लामपूर, आमम शाळा शिराळा (जि. सांगली) या चार शाळांचा समावेश आहे. ५० विद्यार्थ्याचे मॉडेल म्हणता म्हणता एकूण  ७५ विद्यार्थी  यात सहभागी झाले आहेत. या विदयार्थ्याचे पालक प्रामुख्याने शेतमजुरी, दगडफोडी, उसतोडी, रोजंदारी घरकाम अशा प्रकारची कामे करतात.

या चारही गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी “ज्वाला नरसिंहाचे प्राचीन मंदीर आहे.त्याच्याच आशीर्वादाने हा प्रकल्प सुरु करण्याची व पेलण्याची प्रेरणा मिळाली.  नरसिंह हा ज्ञानाचा संरक्षक व अज्ञानाचा संहारकर्ता आहे.  त्याच प्रमाणे संस्थेचे काम सुरु आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेचे संरक्षण व संवर्धन केले जाते, तर बुद्धिमत्तेविषयी असणारे  अज्ञान, चुकीच्या संकल्पनांचे निर्मूलन इथे केले जाते.  आदर्श मार्गदर्शक, नेतृत्व गुण विकसित करणारा आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या असताना त्यावर उपाय शोधणारा, कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून प्रश्न सोडविणारा  अशी गुणवैशिष्ट्ये विकसित होणारा माणूस येथे घडतो.  नरसिंह उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांची जडणघडण होण्यासाठी मुलांची अशाप्रकारची गुणवैशिष्ट्ये विकसीत करण्यावर भर दिला जातो.

हा प्रकल्प पंचकोशावर आधारीत असुन यात संपूर्णपणे अशैक्षणिक पद्धतीने कार्यशाळा आयोजीत केल्या जातात. यामधे चर्चा, गटकार्य, खेळ आणि विविध  उपक्रम घेतले जातात. या संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांच्या  काही  मुल्यांकन चाचण्याही घेतल्या जातात.  या प्रकल्पामध्ये  माझ्यासमोर मुलाना सोबत घेऊन जाण्याचे  आव्हान असून त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून माझेही संवर्धन या माध्यमातून होत आहे.

पंचकोशाचा उल्लेख यजुर्वेदातील तैत्तिरीय उपनिषदात आढळतो. त्यात  सांगितल्यानुसार अगदी थोडक्यात सांगायचे तर पाच कोशांनी  मिळून जीव तयार होतो.

1. अन्नमय कोश- यात आपले दिसणारे शरीर व त्या संबंधित कार्य येते.

2. प्राणमय कोश – म्हणजे ऊर्जा शरीर. आपल्या शरीरात असणारे पान, अपान इ. वायू या कोशात येतात.

3. मनोमय कोश- यात मन, भावना, विचार यांचा समावेश आहे.

4. विज्ञानमय कोश- यात बुध्दी, व संबंधित कृती जसे समस्या परिहार

5. आनंदमय कोश- हा कोश म्हणजे नित्य आनंद व तो विविध पध्दतीने व्यक्त करणे.

हे पाचही कोश विकसित होणे म्हणजे मनुष्याचा सर्वांगीण विकास होणे. म्हणूनच टी एम एन पी चे संवर्धन पंचकोशावर आधारित केले जाते.

यात गंमत म्हणजे अशी मी एकटीच नाही तर माझ्यासारख्याच आठशेहून अधिक मुली या प्रकल्पाचा भाग आहेत. खास मुलींसाठी सुरू झालेल्या विविध संवर्धन  प्रकल्पातून जीला शिक्षणात रस आहे, शिक्षणाद्वारे देशसेवा, समाजसेवा करायची आहे अशा मुलींना त्यांची बुद्धिमत्ता  वापरली जावी, त्यांनी अर्थिक, सामाजिक स्तरावर स्वावलंबी असावे यासाठी उपक्रम राबवितो.

  मुलींसाठीच्या प्रकल्पांचा उद्देश हा त्या मुली अबला आहेत व त्यांना मदतीच्या कुबड्या देत राहणे असा अजिबातच नाही, या उलट स्त्रीही मुळातच सक्षम असते यावर विश्वास ठेवून तसेच वंचित समाजातून येऊनही बुद्धिमत्तेने सबळ असल्याची त्यांची ताकद आम्ही विचारात घेतली ही ताकद ओळखून सेवाभाव व स्वतःला सिध्द करण्याच्या इच्छाशक्तीला संस्थेकडून संवर्धनाचे खत पुरविले जाते. शिवाय मुलगी जर धैर्यवान, स्थीर व स्वावलंबी असेल तर ती माहेर, सासर दोन्ही ठिकाणच्या समाजाचे कल्याण करेल हा उद्देश आहे. या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही स्वतःबरोबरच इतरांची जबाबदारी घेण्यास शिकलो आहोत. अशा प्रकारे संस्थेत वर्षभर प्रत्येक स्त्रीचा तिच्या सामर्थ्याचा सन्मान केला जातो. सर्वांच्या चांगल्या विचारांना महत्व दिले जाते. संस्थेच्या विविध उपक्रमातील सहभाग  मला दररोज एक मुलगी म्हणून, स्त्री म्हणून आणि त्याहीपेक्षा माणूस म्हणून समृध्द करत आहे.      

चिन्मयी कुलकर्णी , समन्वयक            

आदिवासी बुद्धिमत्ता विकास प्रकल्प                                                                                 [email protected]

www.tribalmensa.org.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *