बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे– बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून पोलिसांनी बनावट कागदपत्रे आणि ते बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले आहे. या तिघांना बारामतीतून अटक करण्यात आली. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा जेजुरी पोलीस करत आहेत. संबंधित टोळी ही बनावट मार्कशिट किंवा सर्टिफिकेट तयार करुन विकायची. त्यासाठी ही टोळी हजारो रुपये घ्यायची. पण पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने सापळा रचत आरोपींच्या छापखान्यावर छापा टाकत त्यांचा पर्दाफाश केला.

अधिक वाचा  #एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यामध्ये गोपनीय माहिती काढून अवैधरित्या चालणाऱ्या कृतींवर कारवाईबाबत सूचित केले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदिप येळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच इतर महाविद्यालयांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे नीरा या ठिकाणी बनावटरित्या तयार करुन ते लोकांना विकले जातात आणि त्याचा वापर केला जातो.

पोलिसांनी संबंधित माहिती खरी की खोटी याची शहानिशा करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार तसा काहीसा प्रकार केला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पण पोलिसांना आरोपींना रंगेहाथ पकडायचं होतं. त्यामुळे पोलिसांनी पुणे विद्यापीठाच्या स्टाफला सोबत नेत नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकली. यावेळी तिथे असलेल्या सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता तिथे खरंच बनावट सर्टिफिकेट आणि मार्कशिट सापडले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love