पुणे- कोरोनाच्या कालावधीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचे सांगत आम्हा सर्वांचे नितीनजी पालक आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मला काही होत नाही, म्हणणारे लोक जिवानिशी गेले. कोविडचा परिणाम हृदयवार आणि फुफ्फुसावर होत आहे. हे संकट सोपे नाही. मी हात जोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्यांना विनंती करतो. कोरोना संकट ही राजकारणाची वेळ नाही, कोरोना लाईटली घेऊ नका असे गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांना झापल्याची चर्चा रंगली होती. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, जशी आई मुलाला म्हणते ना संभाळून जा, गाडीतून हात बाहेर काढू नकोस, अशा भूमिकेमधून गडकरी सांगत असतात,ते टीका करत नाही. ते फक्त काम करताना संभाळून करा असे सांगत असतात, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आम्ही कोरोनासंदर्भातील सगळे काम संभाळून करत असल्याचेही पाटील म्हणाले. आम्ही कार्यक्रमांची संख्या देखील फार मर्यादीत ठेवली असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फिरुन काम करणाऱ्यांमध्ये स्वत:चा आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असल्याचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याएवढे काम कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केले नसल्याचे ते म्हणाले.
मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना भाजप नेत्यांकडून रसद पुरवली जात असून नागपूर कनेक्शनसंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, सचिन सावंत यांनी आरोप करू नयेत पुरावे द्यावेत, असे पाटील म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना नैराश्य, मानसिक संतुलन बिघडले असल्याची अशी टीका केल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, खरे बोलण्याचा राग चव्हाण यांना आला, असे पाटील म्हणाले.