पुणे व्यापारी महासंघाचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा , पण …


पुणे– पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘मिनी लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. सुरुवातीला यामध्ये रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी आणि दुकानांना ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या बंदला विरोध करत व्यापारी रस्त्यावर उतरले होते. ‘वीकएंड लॉकडाऊन’नंतर  सोमवारी दुकाने उघडणार असा पवित्रा पुण्यातील व्यापारी महासंघाने घेतला होता. दरम्यान,  पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले होता. त्यानुसार व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बैठक झाली. या बैठकीनंतर व्यापारी महासंघाने आपली भूमिका बदलली असून सरकारने संपूर्ण लॉकडाऊन केला तर सरकारला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या काळात मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाइन विक्रीसाठी सूट दिली तर, मग व्यापारीही गुरुवारपासून दुकाने उघडतील, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

अधिक वाचा  कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही.. का आणि कोणाला म्हणाले असे अजित पवार?

प्रशासनाच्या  बैठकीनंतर व्यापारी महासंघाने आपली भूमिका बदलली असून सरकारने संपूर्ण लॉकडाऊन केला तर सरकारला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील कोरोनाची भयावह स्थिती सांगितली. मागील काही दिवसातील आकडेवारी देखील व्यापाऱ्यांना सांगितली. तसेच आगामी काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या आणखी वाढणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडण्याची भूमिका घ्यावी, अशी विनंती केली. कोरोनाची स्थिती पाहता आणि अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे व्यापारी महासंघाने आपले आंदोलन स्थगित केले असून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे रांका यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love