मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार लॉकडाऊनचा निर्णय?


पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला असला तरी, राज्यातील एकूण कोरोना स्थितीचा आढावा घेण्य़ासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यात राज्यात लॉकडाऊन केला जाणार की निर्बंध कडक केले जाणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दिल्लीतही आज एक महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात या बैठकांनंतर काय निर्बंध लावले जाणार? की लॉकडाऊन लावला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणेकरांना संध्याकाळी 6 नंतर अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडता येणार नाही.

अधिक वाचा  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी किंवा निवडणुका हा चांगला पर्याय - सुप्रिया सुळे

पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दिवसाला 4 हजारांहून अधिक बधितांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. डब्लिंग रेट सुद्धा 49 दिवसांवर आला आहे. तर मृत्यू दर 1.95 टक्क्यांवर आहे. शहरात 35 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच बरे होण्याचं प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे.

शहरात कोरोनाचा संसर्गात झपाट्याने वाढ होत असून सोसायटीच्या इमारतीत मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे शहरात एकूण 268 कंटेन्मेंट झोन तयार झाले असून यामध्ये 115 इमारती तर 111 सोसायटी यांचा समावेश आहे.

एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. शहरातील कोरोना संसर्ग कसा आटोक्यात आणायचा यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे आणखी कडक निर्बंध केले गेले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love