पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी 661 नवीन रुग्ण आढळल्यानंतर आज त्यामध्ये आज 82 ने वाढ झाली आहे. सोमवारी 328 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये मंगळवारी एकदम दुपटीने वाढ झाल्यानंतर आज पुन्हा हा आकडा वाढल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पुणे शहरातही कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ बुधवारी(743) झाली. दरम्यान, आज दिवसभरात 6 हजार 514 जणांची तपासणी करण्यात आली. त्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 11.40 टक्के इतकी आहे. आता पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 559 इतकी झाली आहे.
बुधवारी सायंकाळी साडेचार पर्यन्त पुणे शहरातील विविध रुग्णालयात ऑक्सीजनवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 410 इतकी असून 207 रुग्ण गंभीर आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक रुग्ण शहराबाहेरील आहे. आजपर्यंत पुणे शहरात 4 हजार 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत एकूण 11 लाख 14 हजार 668 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून यापैकी 1 लाख 99 हजार 696 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर त्यापैकी 1 लाख 91 हजार 300 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. पुणे शहरात सध्या 2896 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 164 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.