संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांनी राठोडांची गच्छन्ती करावी – चित्रा वाघ

राजकारण
Spread the love

पुणे- राज्यातील  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे पूजा चव्हाण सारखे 100 गुन्हे महाराष्ट्रात झाले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हे बलात्कारी मंत्र्यांना वाचवणारे सरकारे आहे अशी टीका करीत पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संजय राठोड बेपत्ता असताना मंत्रिमंडळाच्या संपर्कात होता असे आम्हाला सांगितले जाते. परंतु, राठोड हे दोषी आहेत, हत्यारा आहे, 15 दिवस कुठे लपून बसला होता? असा सवाल करीत पूर्ण  पोलिस यंत्रणा त्याच्या दावणीला बांधून कारभार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा वेगळी आहे.  त्यांनी योग्य  भूमिका घेऊन संजय राठोड यांची मंत्रीपदावरून गच्छन्ती करावी अशी मागणी वाघ यांनी यावेळी केली.  

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या वानवडी भागातील घटना स्थळाला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांनी पोलिस यंत्रणा ही राठोड यांना पूर्णपणे  वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे  आणि त्यांच्या दावणीला बांधली असल्याचा आरोप केला. पोलिस पूर्णपणे दाबावाखाली काम करत आहेत. त्यामुळेच पूजा चव्हाण हिच्या हत्येची जी घटना घडली तेव्हा तिच्याबरोबर जे दोघेजण होते ते संजय राठोड यांच्याशी संपर्कात होते हे ऑडिओ क्लिप्सवरून स्पष्ट होत असतानाही  त्या दोघांचे केवळ जबाब घेऊन त्यांना पोलिसांनी का सोडून दिले? त्यांना ताब्यात त्यांची पोलिस कोठडी का घेतली नाही? असा सवाल त्यांनी केला. आता ते दोघे फरार असल्याचे आणि त्यांच्या घराला टाळे असल्याचे पोलिस सांगतात. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लगड हे ‘रगेल’ पद्धतीने प्रश्नांना उत्तरे देतात, लगडला चालवणारा बाप कोण आहे ते आम्ही शोधून काढू असा इशाराही वाघ यांनी यावेळी दिला. हत्यारा संजय राठोड याला वाचवण्यासाठी पोलिस आपले सर्वस्व पणाला लावत आहेत असा आरोपही त्यांनी केला. संजय राठोड यांची या प्रकरणी जोपर्यंत चौकशी होत  नाही, तोपर्यंत चौकशी अहवालाचा काही उपयोग नाही. ही जनतेच्या डोळ्यातील धूळफेक आहे असे त्या म्हणाल्या.

पूजा चव्हाण प्रकरण घडले तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झालेला होता त्यामुळे त्यांना ‘एक्सकयूज’ परंतु राज्याला दोन गृहराज्यमंत्री त्यांनाही बोटभर प्रतिक्रिया द्यावीशी का वाटली नाही? असा प्रश्न उपस्थित करत हे एकट्या दुकट्याचे काम नाही तर ‘हम साथ साथ है, बलात्कारी को बचाने के लीये’ असे हे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

हा केवळ पूजा चव्हाण पुरता प्रश्न नाही तर महिलांचा विषय हा राजकारणाच्या पलीकडचा विषय असतो. महिलांच्या अस्तित्वाचा तो प्रश्न असतो. सामाजिक विकृती जरी असली तरी सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. पूजा चव्हाणचे आई-वडील यांनी तक्रार दाखल केली नाही मग तुम्ही सुमोटो म्हणून गुन्हा का दाखल केला नाही? ‘शक्ति’ सारख्या कायद्यात जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बलात्कारी मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना  ‘क्लीन चीट’ द्या आणि बाकीच्यांवर गुन्हे दाखल करा असे आहे की काय  अशी उपरोधिक टीकाही वाघ यांनी केली. कायदे करायचे आणि त्यांची अंमलबजावणी आपल्या मंत्र्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत करायची नाही, मग त्या कायद्यांचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार पाठीशी घालणार नाहीत

दरम्यान, या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता चित्रा वाघ म्हणाल्या, शरद पवार साहेबांच्या तालमीत मी तयार झाले आहे. त्यांच्या इतकी विश्वासार्ह व्यक्ति कोणी नाही तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमाही वेगळी आहे. शरद पवार यांच्यापर्यन्त योग्य माहिती दिली गेली की नाही हे पहावे लागेल परंतु, ते निश्चितपणे कोणाला पाठीशी घालणार नाही असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. तर मुख्यमंत्र्यांनी योग्य भूमिका घेऊन संजय राठोड यांची गच्छन्ति केली पाहिजे असे त्या म्हणाल्या.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *