पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामांच्या बाबतीतील दिरंगाई अथवा टाळाटाळ त्यांना कधीच सहन होत नाही. बारामती तर त्यांचा मतदार संघ. त्यामुळे ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी शासकीय कामांबरोबरच मतदार संघात घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलही ते सडेतोड बोलतात आणि कारवाई करण्याचे आदेशही देतात,याची प्रचिती अनेकदा आली आहे. मध्यंतरी, दिवाळीच्या काळात बारामती शहरात खासगी सावकारीला कंटाळून व्यापारी प्रीतम शहा लेंगरेकर यांनी आत्महत्या केली होती. प्रीतम शहा यांच्या मृत्यूनंतर दिवाळीच्या पाडव्याला दुकान उघडल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली होती. या प्रकरणी बारामती पोलिसांनी मोठी कारवाई करीत राष्ट्रवादी काँग्रसच्या एक बड्या नेत्यासह सहा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.
खासगी सावकारी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केल्यामुळे बारामती शहरासह पुणे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली होती. अटक झालेल्यांमध्ये नगरसेवकांसह, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
आज(सोमवारी) अजित पवार हे बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन. कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम खासगी सावकारांना भरला.
पवार म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही.