पुणे- सीरम इन्स्टीट्युटला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होपाळून मृत्यू झाला होता आणि कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टीटयूटला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा घात होता की अपघात होता, हे सांगता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे , खासदार गिरीश बापट, इन्स्टीटयूटचे अध्यक्ष सायरस पूनावाला, सीइओ आदर पूनावाला यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जिथे ही दुर्घटना घडली त्या इमातारीतील पहिला आणि दुसरा मजल्याचा वापर केला जात आहे. वरचे मजले वापरात नव्हते तिथे नवीन केंद्र सुरू केले जाणार होते. काल अचानक आग लागल्याचे समजल्याने आपल्या बरोबरच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आणि लसीकरणाचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला परंतु, सुदैवाने कोरोनावारील लसीचे जे केंद्र आहे ते घटना घडली त्या केंद्रापासून अंतरावर आणि सुरक्षित आहे. त्याला कुठलीही हानी पोहोचलेली नाही. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतरच निष्कर्ष काढता येईल असे सांगून ठाकरे म्हणाले, नक्की आग कशामुळे लागली? तसेच कोणी दोषी आहेत का? किंवा कारवाई काय करायची? याबाबत सांगता येईल.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांना सीरम इन्स्टीटयूटने मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता असल्यास सरकार नक्की करेल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सीरमचे एक हजार कोटीचे नुकसान
दम्यान,सीरम इन्स्टीटयूटचे या घटनेत एक हजार कोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती सीइओ अदर पूनावाला यांनी दिली. याठिकाणी असलेली उपकरणे, रोटा आणि बीसीजी लसीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
















