पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून वाय४डी फाऊंडेशन आणि आधार हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात आयुष्यमान आधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
सर्वसामान्य जनतेला कोविड १९ या महामारीपासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकल्पाची पायाभरणी झालेली आहे. या प्रकल्पाद्वारे नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे जेणेकरून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिक योग्य ती काळजी घेतील. तसेच, प्राथमिक स्वरूपातील आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. आणि याच बरोबर, कोविड १९ चा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे याकडे लक्ष देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे (immunity booster) महाशक्ती नावाचे पाऊडर देखील नागरिकांना वाटले जाणार आहे.
नुकतेच आयुष्यमान आधार या प्रकल्पाची सुरुवात पुण्यातील भैरवनाथ मंदिर, भादस तालुका मुळशी येथून करण्यात झाली. तसेच, पश्चिम व दक्षिण भारतातील कोविड १९ प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रातिनिधिक आरोग्य तपासणी या अंतर्गत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडक शहरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल.
महाराष्ट्र राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या शासकीय अभियानामध्ये शक्य असेल त्या त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या सोबत आरोग्य शिबिरे राबविण्याचा प्रयत्न आयुष्यमान आधार मार्फत करण्यात येईल.
यावेळी आधार हाऊसिंग फायनान्सचे मुख्य लोक अधिकारी (chief people officer) ऋषिकेश झा, वाय४डी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रफुलकुमार निकम, पुण्याचे झोनल बिझनेस हेड विकास सक्सेना, एरिया बिझनेस हेड रंजन कुमार, पॅथॉलॉजीस्ट सचिन कुसळे, एमडी डॉ. झोपे, मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ वायळे आदी उपस्थित होते.