पुणे—पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल’ बस सेवा आता केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘पीएमपीएमएलने ‘अटल’ प्रवासी योजनेअंतर्गत ही फीडर बस सेवा सुरू केली आहे. यामध्ये फक्त पाच रुपयांत पाच किलोमीटरचा सुखकर प्रवास करता येणार असून, दर पाच मिनिटांनी ही बस उपलब्ध होईल. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे.
तसेच शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बस पोचावी या उद्देशाने (लास्ट माइल कर्नेक्टिव्हटी साठी) ३७ नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. बस डेपोपासून आतल्या भागांत राहणारे नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बस डेपोपर्यंत पोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ३७ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावर पहिल्यांदाच बसेस धावणार आहेत. सर्व बस डपाेचे व्यवस्थापक, चालक, वाहक, प्रवासी यांचे अभिप्राय, तसेच स्वयंचलित प्रवास भाडे संकलन प्रणालीचा प्रतिसाद घेऊन त्या मार्गाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
अलायनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स Aligning transit on all lenses म्हणजेच ‘अटल’ प्रवासी योजनेत शहराच्या मध्यवर्ती भागात ‘ मिनि बस ’धावतील जेणेकरून जास्त अंतराच्या मार्गावरील बसेसना पूरक अशी बस सेवा पुरवली
जाईल. तसेच बस लांब अंतराच्या मार्गावरील बसेसची वांरवारता तुलनेने कमी असते. ती बस निघून गेली की पुन्हा त्याच नंबरची बस येईपर्यंत प्रवाशांना वाट पहावी लागत असे परंतु अटल बस सेवेमुळे त्याच मार्गावर जाणाऱ्या दुसऱ्या पर्यायी तात्काळ उपलब्ध होणार आहेत.
‘‘सदर फीडर बससेवेमुळे प्रवाश्यांच्या वेळेत बचत होईल आणि पीएमपीची सेवा अधिक सक्षम होईल. उदाहराणार्थ; स्वारगेटपासून पिंपरी-चिंचवडला जाणारी बस निघून गेली तर पुन्हा त्याच बसची वाट पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. अटल सेवेतील स्वारगेट ते शिवाजीनगर बस पाच मिनिटात मिळेल व त्यातून पाच रुपयांत शिमला ऑफिस, शिवाजीनगर येथे जाता येईल, जेणेकरून तिथे पिंपरी-चिंचवडला जाणान्या इतर अनेक बसेस त्वरीत उपलब्ध होतील. यामुळे प्रवाशाचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच, लांब टप्प्याच्या प्रवासाला उभे राहून ताटकळत प्रवास करण्याची गरज पडणार नाही.’’ असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले तर ‘‘अटलच्या माध्यमातून सामान्य पुणेकराना केवळ ५ रुपयांत गतीमान, खात्रीशीर प्रवास देणेकरीता नावीन्यपूर्ण ही योजना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांच्या सेवेस दाखल करीत असल्याचा आनंद होत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.