मुंबई– राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी पत्रात जी भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचे पवारांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांनी हे पत्र ट्वीट केले आहे.
पवार यांनी राज्यपालांचे पत्र राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखं भासत असल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचं सांगितलं आहे.
“राज्यपालांचं एखाद्या मुद्द्यावर स्वतंत्र मत असू शकतं हे मला मान्य आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं मत व्यक्त केलं याचंही कौतुक आहे. पण मीडियामध्ये हे पत्र प्रसिद्ध होणं आणि ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी यावेळी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राची प्रतही जोडली आहे.