पुणे(प्रतिनिधी): सर्वपित्री अमावस्येच्या पवित्र पर्वदिनी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच धर्मरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक नमन करण्यासाठी ‘सामूहिक तर्पण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील एस. पी. कॉलेज कॅम्पसमधील लेडी रमाबाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
अरुंधती फाउंडेशन, पुणे आणि श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून भारतीय संस्कृतीतील पूर्वजांविषयीची कृतज्ञता, त्यागाची परंपरा आणि राष्ट्रधर्मासाठी बलिदान देणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती अरुंधती फाउंडेशनचे अध्यक्ष हिमांशु गुप्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आदित्य गुप्ते उपस्थीि होते.
शिक्षण प्रसारक मंडळ पुणेचे अध्यक्ष सदानंद गोविंद फडके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. श्रीमती स्वाती गोयल शर्मा या प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी तर्पण करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून रूढ आहे. याच परंपरेला व्यापक सामाजिक आणि राष्ट्रीय संदर्भ देत यंदाच्या कार्यक्रमात केवळ आपल्या कुटुंबातील पूर्वजांचेच नव्हे, तर समाज, संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या वीरांचेही सामूहिक स्मरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता इतिहास, संस्कृती, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध वक्त्या आणि प्रमुख निमंत्रित श्रीमती स्वाती गोयल शर्मा यांचे ‘जॉब्स ऑफ बॉलीवूड’ या विषयावरील विशेष ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशन.
मनोरंजनविश्वातील विविध क्षेत्रांमधील कामाच्या संधी, त्यामागील कार्यपद्धती आणि बॉलीवूडशी संबंधित विविध पैलू यांचा ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून परिचय या वेळी करून दिला जाणार आहे.
“आपल्या धर्मासाठी… आपल्या मातृभूमीसाठी… ज्यांनी बलिदान दिले, त्या असंख्य पूर्वजांना आणि हुतात्म्यांना कृतज्ञ अभिवादन” ही या सामूहिक तर्पण कार्यक्रमामागील मुख्य संकल्पना आहे असे गुप्ते यांनी स्पष्ट केले.
भारतीय समाजाच्या सामूहिक स्मृतीमध्ये ज्यांचे योगदान अमूल्य आहे, अशा व्यक्तींच्या त्यागाचे स्मरण करून नव्या पिढीला त्यांच्या कार्याची आणि बलिदानाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य गुप्ते यांनी दिली.
या उपक्रमाला कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, अयोध्या फाउंडेशन तसेच कै. श्रीकांत लिगायत मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांचेही सहकार्य लाभले आहे.














