‘सुपर एलनिनो’ची धोक्याची घंटा; भारतीय मान्सूनवर चिंतेचे सावट, जागतिक हवामान संघटनेचा इशारा

सुपर एलनिनो'ची धोक्याची घंटा
सुपर एलनिनो'ची धोक्याची घंटा

पुणे(प्रतिनिधी)– प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेली एलनिनोची स्थिती आगामी काळात अधिक रौद्र रूप धारण करणार असून, त्याचे रूपांतर ‘सुपर एलनिनो’मध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नैसर्गिक बदलामुळे केवळ भारतावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर दुष्काळ, भीषण उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टीसारख्या टोकाच्या हवामान संकटांचे सावट निर्माण झाले असून, यामुळे भारतीय मान्सूनवर मोठा दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे. जागतिक हवामान संघटनेने हा इशारा दिला आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या ‘ग्लोबल सीजनल क्लायमेट अपडेट’ या ताज्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रशांत महासागरातील एलनिनोची स्थिती कमालीच्या वेगाने तीव्र होणार आहे. जगातील आघाडीच्या हवामान संस्थांनी विकसित केलेल्या संगणकीय मॉडेल्समध्ये या प्रक्रियेबाबत मोठे एकमत दिसून आले असून, हा धोका आता अधिक स्पष्ट झाला आहे. सद्यस्थितीत मध्य आणि पूर्व विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या तापमानातील ही वाढ एलनिनो अधिक बळकट होण्याचे प्रमुख लक्षण मानले जाते.

अधिक वाचा  राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : कोकण विभाग अव्वलस्थानी

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत, म्हणजेच उत्तर गोलार्धात शरद ऋतू सुरू असताना, एलनिनो आपली सर्वोच्च पातळी गाठू शकतो. विशेष म्हणजे, याच काळात विषुवृत्तीय अटलांटिक महासागराचे तापमानही वाढणार असल्याने जागतिक हवामान चक्रावर एकाच वेळी अनेक महासागरांचा परिणाम दिसून येईल. डब्ल्यूएमओच्या विश्लेषणानुसार, जगातील ६० अंश दक्षिण आणि ६० अंश उत्तर अक्षांशाच्या दरम्यान असलेल्या बहुतांश लोकवस्तीच्या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता ८० टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये प्रशांत महासागरातील १८० अंश रेखांशावर असलेल्या ‘डेटलाईन’च्या पूर्व भागातील तापमान वाढीचा मोठा वाटा असेल.

भारतीय उपखंडासाठी हा इशारा धोक्याची घंटा मानला जात आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ दरम्यान भारतीय उपखंड, हिंद महासागराचा काही भाग आणि ऑस्ट्रेलियात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडणार आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांनी असेही स्पष्ट केले आहे की, एलनिनो सक्रिय असला तरी देशात थेट दुष्काळच पडेल असे ठामपणे सांगता येणार नाही. भारतीय पावसावर एलनिनोप्रमाणेच ‘हिंद महासागर द्विध्रुव’ (आयओडी) या हवामान प्रणालीचाही मोठा प्रभाव असतो. एलनिनो आणि लानिना या ‘एनसो’ (ENSO) प्रणालीच्या दोन परस्पर विरोधी अवस्था असून, साधारणपणे ९ ते १२ महिने टिकणाऱ्या एलनिनोचा सर्वाधिक परिणाम तो तयार झाल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी जागतिक तापमानावर दिसून येतो.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा : आत्महत्या नव्हे तर गळा दाबून खून?

भारतातील मान्सूनचे अंतिम चित्र हे केवळ एलनिनोवर अवलंबून नसून, आगामी काही आठवड्यांतील आयओडीची स्थिती, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची क्षेत्रे आणि अरबी समुद्रातील हालचालींवर निश्चित होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘सुपर एलनिनो’ची टांगती तलवार असली तरी, भारतीय हवामान तज्ज्ञ या सर्व जागतिक आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love