केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट : हत्येच्या कटाची माहिती असलेला तिसरा तरुण ताब्यात : सिया गोयलची मुजोरी कायम

केतन अग्रवाल हत्या प्रकरण (Ketan Agarwal Murder Case)
केतन अग्रवाल हत्या प्रकरण (Ketan Agarwal Murder Case)

पुणे(प्रतिनिधी)-पुण्यातील प्रसिद्ध केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट समोर आला आहे. केतनच्या हत्येचा कट केवळ सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाच ठाऊक नव्हता, तर चेतनच्या एका वर्गमित्रालाही याबद्दल आधीच माहिती होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी-बाणेर परिसरातील एका नामांकित खाजगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता आणि या दोघांनी हत्येचा कट रचताना त्याच्याशी सविस्तर चर्चाही केली होती.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने या मित्राला केतनची हत्या करण्याच्या प्लॅनबद्दल सांगितले होते, तेव्हा या मित्राने त्यांना “हत्या करण्याची गरज नाही, तुम्ही असे काही करू नका” असा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे, १८ जून रोजी हत्येच्या दिवशी चेतनने या मित्रालाही लोहगडावर आपल्यासोबत येण्याचा मोठा आग्रह केला होता, मात्र तो तरुण त्या दिवशी तिथे गेला नाही आणि त्याने आपला फोनही बंद ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे, केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर चेतन सर्वात आधी याच मित्राला जाऊन भेटला होता. जर या मित्राने वेळेत पोलिसांना या कटाची माहिती दिली असती, तर कदाचित ही हत्या रोखता आली असती आणि केतनचे प्राण वाचले असते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सध्या या तरुणाला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार केले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

अधिक वाचा  मर्सिडीजखाली चिरडून ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

सिया गोयलची मुजोरी कायम : माध्यम प्रतिनिधींना बघून केले अश्लील हावभाव

दुसरीकडे, सिया हिला पोलीस तपासासाठी गंगाधाम परिसरातील तिच्या घरी घेऊन गेले असता, तिथे वार्तांकनासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींना बघून सियाने अश्लील हावभाव केले आणि मधले बोट दाखवून आपली मुजोरी दाखवून दिली. एका निष्पाप तरुणाची हत्या केल्याचा कोणताही पश्चात्ताप तिच्या चेहऱ्यावर दिसत नसून, ती अत्यंत निर्लज्जपणे  पद्धतीने वागत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ती पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नसून वारंवार आपली विधाने बदलत आहे आणि हत्येचा संपूर्ण दोष चेतन चौधरीवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचे सर्व पुरावे गोळा करत असून त्यांनी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचा देखावा (क्राईम सीन रिक्रिएशन) पुन्हा साकारला आहे. आरोपींनी केतनला ढकलण्यापूर्वी त्या ठिकाणी हत्येचा सराव  केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. सियाने खुनाचे कोणते पुरावे नष्ट केले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तिच्या घरातील कपडे, मोबाईल आणि इतर वस्तूंचा पंचनामा करत आहेत. तपासातील विसंगती आणि आरोपींच्या जबाबातील खोटेपणा शोधण्यासाठी पोलिसांनी आता न्यायालयाकडे ‘लाय डिटेक्टर’ चाचणीची परवानगी मागितली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेचा, केतनच्या बहिणीचा संशय आणि डिजिटल पुराव्यांमुळे पर्दाफाश झाला असून, हा एक थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित कट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीसांकडून काेबिंग ऑपरेशन: 414 गुन्ह्यात 443 आराेपींना अटक

क्राइम पेट्रोल’ पाहून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न

पोलीस तपासात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतनचा काटा काढण्यापूर्वी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेचे अनेक एपिसोड्स पाहिले होते. हत्या केल्यानंतर पोलिसांच्या तपासातून कसे सुटायचे आणि पुरावे कसे नष्ट करायचे, याचे धडे त्यांनी या मालिकेतून घेतल्याचे समोर आले आहे.

लुल्लानगरच्या टेकडीवर झाली होती ‘मर्डर रिहर्सल’

पुणे पोलिसांनी गुरुवारी आरोपी सिया गोयलला सोबत घेऊन लुल्लानगर भागातील एका टेकडीवर नेले होते. लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलण्यापूर्वी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी याच टेकडीवर ‘मर्डर रिहर्सल’ केली होती, असा पोलिसांना संशय आहे. या जागेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी सियाला तिच्या घरी नेऊन सुमारे ३० मिनिटे घराची झडती घेतली. यावेळी तिच्या घरातून घटनेच्या दिवशी घातलेले कपडे आणि काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  पुणे: वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love