निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक; उमेदवारी माघारीवर स्पष्टीकरण

निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक

पुणे(प्रतिनिधी)– सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि पक्षाच्या आदेशानुसार (व्हीप) हात वर करून मतदान करण्याची पद्धत लागू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. या निवडणुकांमधील घोडेबाजार थांबवण्यासाठी आपण संसदेत एक खाजगी विधेयक सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या निवडणुका केवळ पैशाच्या जोरावर लढवल्या जात आहेत, ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यांसारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून किंवा पैशांचे आमिष दाखवून लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हा ‘घोडेबाजार’ कायमचा बंद व्हावा, यासाठीच आपण हे कायदेशीर पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि निवडणुकीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी हा लढा आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या.

ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाने पुण्याची विधानपरिषदेचे जागा न लढवण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक सिल्वरओक या ठिकाणी झाली. या बैठकीला काँग्रेसचे पुण्यातील वरिष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर आणि पुणे मनपातील कॉंग्रेसचे गटनेते चंदू कदम उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात आला, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांच्या नाराजीवर बोलताना त्या म्हणाल्या की, आपण स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, विश्वजीत कदम, सतेज (बंटी) पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत. कोणाच्या काही शंका किंवा गैरसमज असतील, तर ऑन-कॅमेरा चर्चेला आपण कधीही तयार आहोत, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

अधिक वाचा  पुणे विधान परिषद: अजित पवार गटात उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य; विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंचाही अर्ज

अर्ज मागे घेण्यावरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना सुळे म्हणाल्या की, केवळ एका ठिकाणी नाही तर राज्यात जवळपास आठ ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे आणि प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती वेगळी होती.

भाजपने तोंड उघडायला लावू नये

भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीला ‘माघार पार्टी’ म्हणून हिणवण्यापेक्षा आपल्या कृतीकडे लक्ष द्यावे. सुप्रिया सुळे यांनी भाजपला कडक शब्दात इशारा दिला की, त्यांनी मला तोंड उघडायला लावू नये, कारण सध्या राज्यात जो घोडेबाजार झाला आहे आणि ज्या पद्धतीने सत्ताकारण सुरू आहे, ते कशामुळे आणि कसे झाले आहे हे जनतेला आणि मलाही चांगल्या प्रकारे माहित आहे.

वॉशिंग मशीनराजकारणावर टोला

अधिक वाचा  'लाडकी बहीण' योजनेत 'इलेक्टोरल भ्रष्टाचार'; आरटीई, शिक्षण अभियानाचा निधी वळवला: सुप्रिया सुळेंचा खळबळजनक आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडेबाजाराचे पुरावे मागितल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री जिथे सांगतील तिथे पुरावे देण्याची आपली पूर्ण तयारी आहे. केवळ ‘वॉशिंग मशीन’ राजकारण करून किंवा पक्ष फोडून सत्ता मिळवणे हे सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. “अभ्यास करून परीक्षेत पास होण्यात जी मजा असते, ती कॉपी करून पास होण्यात नसते,” अशा शब्दांत टोला लगावला. लोकशाहीत प्रत्येक मतदाराला आपला प्रतिनिधी कोणाला मतदान करत आहे, हे पाहण्याचा अधिकार असावा, तरच खऱ्या अर्थाने निवडणुका पारदर्शक होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा सूचना देण्यात आली नव्हती – चंदू कदम

पुणे काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे झालेल्या बैठकीत उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा सूचना देण्यात आली नव्हती असे सांगत सुप्रिया सुळे यांचा दावा फेटाळला.

अधिक वाचा  <strong>कसब्यात परिवर्तनाची सुप्त लाट : रविंद्र धंगेकर</strong><strong></strong>

चंदू कदम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक कशी लढवायची, काँग्रेसकडे किती मते आहेत आणि निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखावी, यावर चर्चा करण्यासाठी आम्हाला मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर बोलावण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून मी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होतो.

बैठकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात काही चर्चा झाली असेल, तर त्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. चंदू कदम यांनी पुढे सांगितले की, सिल्व्हर ओकवरील बैठकीत केवळ निवडणुकीची रणनीती, मतांची गणिते आणि पुढील राजकीय भूमिका यावरच चर्चा झाली. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आम्हाला थेट माहिती मिळाली की, श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय बैठकीत चर्चिला गेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love