पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक;
राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक;

पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी शाईच्या बाटल्या ओतून हल्ला करण्यात आला. वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा हल्लेखोरांनी केला आहे. लोणी काळभोर परिसरात आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी लवांडे यांच्यावर केवळ शाईच फेकली नाही, तर त्यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही लवांडे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हभपसं ग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आळंदी म्हातोबा येथे आयोजित एका प्रवचन कार्यक्रमानंतर विकास लवांडे बाहेर येत असताना अचानक आलेल्या जमावाने त्यांना घेरले आणि त्यांच्यावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या. या घटनेनंतर लवांडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा निषेध नोंदवला; लवांडे यांच्या अंगावरील शाई स्वच्छ करण्यासाठी समर्थकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नामघोषात त्यांचा पोलीस ठाण्याबाहेरच ‘दुग्धाभिषेक’ केला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि त्यांची शस्त्रे जप्त केली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा लवांडे यांनी घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणात सशस्त्र कायद्यानुसार  गुन्ह्याची नोंद केली असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेबाबत बोलताना विकास लवांडे यांनी सांगितले की, आळंदी म्हातोबा येथे आठ वाजता प्रवचन होतं, प्रवचन सेवा संपवून मी दहा वाजता बाहेर पडलो, मला रस्त्यात एकांतात तीन-चार गाड्या एकदम आल्या, त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून खाली उतरवलं, त्यामध्ये संग्राम भंडारी हा व्यक्ती मी ओळखला, उरुळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक ओळखायला आला बाकीचे सगळे अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, मला तिथे त्यांनी रिवॉल्वर दाखवली. आवाज करायचा नाही वगैरे सांगितलं. तुझा मी खात्मा करणार आहोत असेही ते बोलत होते, आमच्या गुरूला तू का बोललास. असंही ते मला बोलले त्यानंतर माझ्या अंगावर एकदम दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतायला सुरूवात केली, मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ते निघून गेले, आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध रहा असंही त्यांनी वक्तव्य केलं, असा आरोप लवांडे यांनी केला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरे यांचा घणाघात : "जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात" :

वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्ण वर्चस्ववादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाहीत अशा लोकांना माझ्या भूमिकेने कदाचित ते अस्वस्थ होत असावे, त्याच्यातूनच संग्राम भंडारी यांनी संगमनेरमध्ये हैदोस घातला होता. त्यावेळी तो गुंड घेऊन आला होता, वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या संदर्भात वक्तव्यामुळे तो आमच्या गुरूला असं का बोलला वगैरे बोलत होता, त्यामुळेच त्याने माझ्यावर हल्ला केला असावा, लोक तिथे जमायला लागले म्हणून मी वाचलो. माझा ड्रायव्हर सोबत होता त्याच्यामुळे मी वाचलो. नाहीतर आज माझा खात्मा झाला असता, असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

गलिच्छ आरोप खपवून घेतले जाणार नाहीत- हभप संग्राम भंडारे

गेल्या अनेक दिवसांपासून विकास लवांडे हे वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान असलेल्या गुरूंवर टीका करत होते. ज्या गुरूंनी आम्हाला लहानाचे मोठे केले आणि धर्माची खरी शिकवण दिली, त्या गुरूंना ‘घुसखोर’, ‘धर्मांध’ आणि ‘मनुवादी’ म्हणणे अत्यंत निंदनीय असून हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, अशी आक्रमक भूमिका संग्राम बापू भांडारे यांनी मांडली. वारकऱ्यांसाठी गुरु हा ‘संतकळेचा राजा’ आणि ‘प्राण विसावा’ असतो, त्यामुळे त्यांच्यावरील गलिच्छ आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  Raj Thackeray : महाराष्ट्राचे 'युपी-बिहार' करू नका, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही : राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना कडक इशारा

शाईफेकीच्या या घटनेनंतर विकास लवांडे यांनी आपल्यावर पिस्तूल रोखल्याचे आणि समोर गुंड उभे केल्याचे आरोप केले. मात्र, भांडारे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत लवांडे यांची तेवढी पात्रताही नसल्याचे म्हटले. संत तुकाराम महाराजांनी शिकवल्याप्रमाणे, “तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करूनया,” यानुसार संतांना आणि गुरूंना त्रास देणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले आहे, असे स्पष्टीकरण भांडारे यांनी दिले.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा-तुकोबांचे वारकरी आहोत, त्यामुळे चांगल्या माणसांशी आम्ही मऊ मेणासारखे वागू पण नटळांच्या डोक्यात काठी हाणायलाही मागे पुढे पाहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे काठी देऊ माथा’ या तत्त्वानुसार ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  विमान आणि रस्ते अपघातांनी हिरावले देशाचे 'तेज'; संजय गांधींपासून अजित पवारांपर्यंत नेत्यांच्या अपघाती निधनाचा आढावा

यावेळी बोलताना संग्राम बापू भांडारे यांनी विकास लवांडे यांना शेवटचा इशारा दिला की, इथून पुढे जर पुन्हा कधी आमच्या गुरूंवर किंवा वारकरी संप्रदायावर अशाच प्रकारे गलिच्छ भाषेत टीका केली, तर त्यांना यापेक्षाही भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल

केवळ प्रसिद्धीसाठी हे स्टंट- रोहित पवार

या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन लवांडे यांना पाठिंबा दर्शवला आणि सत्ताधारी तसेच संबंधित ‘भोंदू बाबां’वर कडाडून टीका केली. “भररस्त्यात बंदुका दाखवणे ही वारकरी संप्रदायाची पद्धत नाही,” असे म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला. जे आज धर्माच्या गप्पा मारत आहेत, त्यांनी आपल्या शाळांमध्ये बहुजन समाजाच्या मुलांना प्रवेश दिला जातो का? याचे उत्तर द्यावे, असे आव्हान पवार यांनी दिले. तसेच, मध्यप्रदेशचे बागेश्वर महाराज जेव्हा महाराजांबद्दल वादग्रस्त बोलले होते, तेव्हा हे लोक गप्प का होते? असा सवाल उपस्थित करत केवळ प्रसिद्धीसाठी हे स्टंट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लवांडेंनी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वी लवांडे यांनी एक पत्रकारपरिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते, संतांच्या भागवत वारकरी संप्रदायात धर्मांध आणि मनुवादी विचाराच्या लोकांनी वैचारिक आणि सांस्कृतिक स्वरुपाने घुसखोरी केली आहे आणि त्यातल्या २० लोकांची नावं त्यांनी जाहीर केली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love