पुणे: हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे जतन करणे ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने यासाठी ‘वैयक्तिक सामाजिक जबाबदारी’ (ISR) स्वीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि कवी संजय उपाध्ये यांनी केले. “जेव्हा समाज आपला इतिहास विसरतो, तेव्हा त्याचा भूगोल बदलतो,” या शब्दांत त्यांनी हिंदू समाजाच्या सध्याच्या स्थितीवर परखड भाष्य केले.
इतिहास विसरल्याने भूगोल बदलतो
संजय उपाध्ये यांनी आपल्या भाषणात इतिहासाच्या विस्मृतीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “गेल्या हजार-बाराशे वर्षांपासून आपण या विस्मरणाचा अनुभव घेत आहोत.” स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी आणि शिक्षणप्रणालीने राष्ट्रीय अस्मितेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची पिढी केवळ साक्षर झाली आहे, परंतु सुशिक्षित झाली नाही. सावरकरांच्या ‘सद्गुणांचा अतिरेक ही सुद्धा एक विकृती आहे’ या विधानाचा संदर्भ देत त्यांनी शास्त्र (ज्ञान) सोबतच शस्त्राची (सामर्थ्य) गरज अधोरेखित केली. अफगाणिस्तानपासून पसरलेली हिंदूंची भूमी आज संकुचित झाली आहे, कारण बहुसंख्य असूनही हिंदूंची मानसिकता केवळ प्रार्थना आणि सहिष्णुतेत अडकली आहे. ‘मी, माझी पत्नी आणि माझी मुलं’ या मर्यादित विचारामुळे समाज संकुचित झाला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘उत्तरक्रिया’ आणि ‘तर्पण’ ची नवी व्याख्या
उपाध्ये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकातील एका प्रसंगाचा उल्लेख केला. पानिपतच्या युद्धात सर्वस्व गमावलेली एक स्त्री पुण्या-मुंबईच्या उत्तरेला असलेल्या दिल्लीवर विजय मिळवून पितरांची ‘उत्तरक्रिया’ करण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु पेशव्यांना तिचा हा गर्भितार्थ समजत नाही. आजच्या समाजालाही अशाच ‘उत्तरक्रिये’ची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यासोबतच, आयोजित करण्यात आलेला ‘तर्पण’ विधी केवळ दिवंगत आत्म्यांना शांती देण्यासाठी नसून, तो जिवंत समाजाला जागृत करण्याची ‘ठिणगी’ आहे, असे उपाध्ये म्हणाले. या ठिणगीतून हिंदूंनी एकत्र येऊन आपल्या संस्कृतीतील शास्त्र अभिमानाने जगासमोर मांडावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामुदायिक ऐक्यासाठी अनोखा उपाय
समाजात सामुदायिक ऐक्य निर्माण करण्यासाठी उपाध्ये यांनी एक अनोखा उपाय सुचवला. ज्याप्रमाणे मुस्लिम शुक्रवारी आणि ख्रिस्ती रविवारी सामुदायिक प्रार्थना करतात, त्याचप्रमाणे हिंदूंनी दर शनिवारी नटून-थटून जवळच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणावे, असे आवाहन त्यांनी केले. यातून एक मोठी चळवळ उभी राहू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संस्कृती जतन करण्याची जबाबदारी
अरुंधती फाऊंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी सांगितले की, गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या कोट्यवधी ज्ञात-अज्ञात धर्मवीरांचे तर्पण करण्यासाठी कोणीही उरले नाही. हाच कृतज्ञ भाव जतन करण्यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी सामूहिक तर्पण विधी आयोजित केला जातो.
श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत यांनीही धर्मप्रचारासाठी आठवड्यातील एक दिवस सामूहिक प्रार्थना करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिमांशू गुप्ते यांनी केले, तर विनय वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ या चित्रपटाने झाला.