‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू


पुणे – स्वा.सावरकर यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले माहिती नसलेले वैयक्तिक पैलू, सावरकर आणि पत्नी माई सावरकर यांचे नाते, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरात असलेला दृष्टीकोण,त्यांचे हिंदुत्व विचार, हिंदू राष्ट्राची संकल्पना, कवितांचा अर्थपूर्ण आढावा ,महात्मा गांधी आणि सावरकर यांची भेट, असे विशेष प्रसंग पुणे येथे २३ तारखेला झालेल्या ‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमात उलगडले गेले.

पुणे येथे २३ तारखेला झालेल्या स्वतंत्रते भगवती या साहित्यिक कार्यक्रमात सावरकर स्थानबद्धतेत असताना त्यांनी लिहिलेले साहित्य व नाटके, त्यांनी रत्नागिरीत केलेले सामाजिक काम, प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेली पुस्तके आणि कवितांचा अर्थ, येसुवहिनींचे स्वगत ज्यातून वहिनी आणि दीर यांचे मातृरूप नाते उलगडले, स्वदेशीच्या प्रचारासाठी हाती घेतलेली मोहीम आणि मातृभाषेविषयीचा त्यांचा आदर या अनेक गोष्टी व संदर्भ या कार्यक्रमातून रसिकांसमोर उत्कृष्ट संहितेतून उलगडले.  याची संकल्पना, संशोधन वं संहिता लेखन केले होते डॉ. नयना कासखेडीकर यांनी. या कार्यक्रमात सौ.सीमा भोळे, सौ.माधुरी जोशी, adv सौ.स्नेहा पिंगळे-जोशी आणि डॉ. नयना कासखेडीकर तसेच तबला वादक श्री दत्ता देशपांडे, संवादिनी वादक श्री मिलिंद मराठे यांनी सादरीकरण केले.

अधिक वाचा  'वीर सावरकर वेबसिरीज' सावरकर विरोधकांच्या टीकेला उत्तर असेल- सात्यकी सावरकर

या कार्यक्रमाचा प्रारंभ नटराज पूजन आणि स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन कसबा भागातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश टिळक आणि स्वा. सावरकरांचे बंधु डॉ.नारायणराव सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या हस्ते करून करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वा, सावरकर यांच्या स्वातंत्र्य देवी भगवतीला भरतनाट्यम मधून सरस्वती द्वादशस्त्तोत्र सादर करून वंदना सादर केली. हे नृत्य कल्याणी साळेकर, साक्षी जोशी, तनया कानिटकर आणि गायत्री शहरकर यांनी सादर केले. 

स्वा. सावरकरांनी विपुल आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या एकेक सशक्त कविता त्यांनी अंदमान पूर्व काळात, अंदमानातील बंदिगृहात आणि अंदमानातून बाहेर आल्यावर अशा तीन वेगवेगळ्या काळात लिहिल्या .त्याची पार्श्व भूमी, अर्थ, त्यातील उत्कटता, या कार्यक्रमात मांडली.  सावरकरांच्या आयुष्यातील काही महत्वाचा तपशील व गोष्टी नव्याने कळल्या ज्या कधी वाचल्याही नव्हत्या अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या.रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.    

अधिक वाचा  साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते: अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा -शरद पवार

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांत (मुंबई, पुणे, नाशिक- भगूर, रत्नागिरी, सांगली) वीरभूमी परिक्रमा – स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे .या उपक्रमा अंतर्गत संस्कार भारती पुणे महानगराने रांगोळी प्रदर्शन, नृत्य. संगीत, चित्रकला आणि साहित्य या कलांच्या माध्यमातून स्वा. सावरकर यांच्या विचारांचा जागर आणि त्यांचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचविणे या हेतूने नियोजन केले आहे.

यावेळी सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग, शास्त्रज्ञ श्री काशीनाथ देवधर, विश्व संवादचे रवींद्र जोशी,लोककला अभ्यासक डॉ भावार्थ देखणे ,सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गोडसे आणि संस्कार भारतीचे प्रांत पदाधिकारी, संस्कार भारतीचे कार्यकर्ते व सावरकर प्रेमी रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आवर्जून उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव सौ. धनश्री देवी यांनी केले आणि सप्ताहातले नियोजित कार्यक्रम संगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love