पुणे(प्रतिनिधि)— पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल-3 द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छता गृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई करत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसंच सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी गोरख डोईफोडे, अशोक अडसूळ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून ८ आरोपींना अटक केली आहे.
पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवर असलेल्या ‘एल 3 द लिझर लाउंज’ या पबमधील स्वच्छता गृहात काही तरुण शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती.
पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी, संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर पुणे), सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालीदास देशमाने, योगेंद्र गिरासे, (रा. दवन सोसायटी, श्रीराम स्वीट मार्ट भुगाव मुळशी), रवि माहेश्वरी (रा. उंड्री पुणे), अक्षय दत्तात्रय कामठे (रा. हडपसर माळवाडी पुणे), दिनेश मानकर (रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क हडपसर पुणे) याला अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.
या आयोजीत केलेल्या पार्टीमध्ये ४०-५० लोक होते. त्यांना तपासाला बोलावलं जाणार आहे, अशा प्रकारची पार्टी अजून कुठे झाली आहे का? याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी आणि दोन बीट मार्शल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कामात हलगर्जी आणि आपल्या भागात सुरू असलेल्या गोष्टी माहिती नसणं यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.
झोन-१चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. हॉटेल आणि बार सुरू ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोन मालक आणि दोन आयोजक आणि इतर ५ अशा एकूण ९ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पबमध्ये पार्टीचं आयोजन कसं करण्यात आलं याबाबतचा तपास सुरू आहे. तसंच जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांचा देखील तपास सुरू आहे. काही पुरावे मिळाले आहेत त्याआधारे तपास सुरू आहे. तसंच अल्पवयीन कोणी मुलं होती का, याचाही तपास सुरू आहे.
पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर केले ८० ते ८५ हजार रुपये खर्च
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर ८० ते ८५ हजार खर्च केले आहेत. ४० ते ५० जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे. अनेकदा सूचना देऊनदेखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप गिल यांनी दिली