पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये रेस लागली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या धनिकपुत्राच्या पोर्शे गाडीसोबत जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता, असा खळबळजनक दावा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी अजय डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीदेखील नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, “पबमधून दोन गाड्या निघाल्या होत्या. त्या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहीली त्या गाडीने दोघांना चिरडलं, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. हा कोण आमदार? हे मुख्यमंत्री यांनी सांगीतल पाहिजे. मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले, दोन उपमुख्यमंत्री हे जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यांत आहेत.”
पटोले पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाहिजे की डॉ. तावरेंची नियुक्ती कुणाच्या सांगण्यावरुन झाली आहे? कुठल्या आमदाराने पोलीस आणि डॉक्टरांशी बोलत होते? त्या कारमध्ये कोण होतं? ते अजून कळलेलं नाही. ही नावं का लपवली जातात? आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे तर मोठी थट्टा आहे. असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे. कितीवेळा चिरडू शकता हे विचारायचं होतं का? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला. या घटनेत आमदाराचा मुलगाही होता. आम्ही त्याचं नाव सांगणार नाही ते नाव सरकारने जाहीर करावं असे ते म्हणाले.
राज्य पेटतं आहे आणि मुख्यमंत्री सुट्टीवर
तीन दिवसांसाठी मुख्यमंत्री आराम करायला गेले आहेत. राज्य पेटतं आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत. आता लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? भाजपाला इतके आमदार देऊन चूक झाली का? हा प्रश्न जनता विचारत आहे असेही पटोले म्हणाले.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, या प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरेंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तावरे यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारनं याची काळजी घेतली पाहिजे. पोलीस आणि डॉक्टर यांच्याबरोबर कोण बोलत होतं? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.
उच्चपदस्थ लोकांवरही कारवाई झाली पाहिजे
“ही घटना हायप्रोफाईल आहे, या घटनेत ज्या पद्धतीनं पुरावे नष्ट केले जात होते, त्यावरुन हायप्रोफाईल असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच, या घटनेशी सहाव्या मजल्याचं कनेक्शन नक्कीच आहे. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आता जे पोलीस महासंचालक आहेत, त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. पुण्याचं पोलीस आयुक्ताची खुर्ची आहे तीच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. त्यामुळे पुणे प्रकरणात केवळ डॉक्टरांवरच कारवाई करून चालणार नाही, तर उच्चपदस्थ लोकांवरही कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे. कसबा निवडणूकमध्ये तडीपार असलेल्या लोकांना आणुन फिरवलं जातं होतं. पोलिसांनी कारवाई का केली नाही?” असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
ससून रुग्णालय, पोलीस विभाग आणि राज्यकर्त्यांचे लोक वाचवण्यासाठी डॉ. सापळे समिती
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सापळे कमिटी राज्य सरकारने केली. मात्र डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडे भाडे तत्त्वावरची कार आहे. त्या कारचा देखभाल खर्च एक लाख रुपये आहे. अनेक ठिकाणी त्यांची बदली झाली होती. त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठले आहेत. पोर्श अपघात प्रकरणात दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ससून रुग्णालय, पोलीस विभाग आणि राज्यकर्त्यांचे लोक यांना वाचवण्यासाठी ही कमिटी निर्माण केली गेली आहे.असा आरोप नाना पटोलेंनी केला.
विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा २ जूनला तारखेला
विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा २ जूनला करण्यात येणार आहे. आम्ही दोन जागा लढवणार आहोत, असंही यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं.