पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. हा निकाल ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याच्या दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. नेहमी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल मुलांच्या निकालांपेक्षा २.५६ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुलनेत एकूण निकालात १.९८ टक्के वाढ झाली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची घोषणा केली.यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह राज्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कोकण विभाग निकालात अव्वल
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९४.५६ टक्के आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत एकूण निकालात १.९८ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी राज्याचा दहावीचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला होता.
मुलींची बाजी
मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा १०० टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९४.८६ टक्के इतकी आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
पुणे : ९६.४४ टक्के
नागपूर : ९४.७३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
मुंबई : ९५.८३टक्के
कोल्हापूर : ९७.४५ टक्के
अमरावती : ९५.४८ टक्के
नाशिक : ९५.२८ टक्के
लातूर : ९५.२७ टक्के
कोकण : ९९.०१ टक्के
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org