पुणे(प्रतिनिधि)–पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत वारसा वास्तूंच्या (अ गट) 100 मीटर परिघातील वाडे आणि जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न संसदेच्या पटलावर ठोसपणे मांडून, त्यावर मार्ग काढू अशी ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघातील कसबा गणपती मंदिर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, नाना पेठ परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक हेमंत रासने, गणेश बिडकर,योगेश समेळ, राजेंद्र काकडे, संजय मामा देशमुख, स्वरदा बापट, आर पी आय चे संजय सोनवणे, राजेंद्र कोंढरे, उमेश अण्णा चव्हाण, अरविंद कोठारी, पुष्कर तुळजापूरकर,मदिना तांबोळी, बापू नाईक, निलेश आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय दराडे, शिवसेनेच्या नेत्या सुदर्शना त्रिगुणित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद गवळी, गणेश भोकरे आरपीआयचे मंदार जोशी, संजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, पुरातन वास्तूच्या परिसरातील नवीन बांधकामांना तसेच जुन्या बांधकामाच्या पुनर्विकासाला असेलेल्या मर्यादा किंबहुना बंदी यामुळे गेली कित्यक दशके एकापाठोपाठ एक जुने वाडे जमीनदोस्त होत चालले आहेत. पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शिवकालीन तसेच पेशवेकालीन पुण्याची ओळख असलेल्या या वाड्यांचा पुनर्विकास आवश्यक आहे.
या वाड्यांमध्ये राहाणारे बहुसंख्य मूळ मालक आधीच वाडे सोडून अन्यत्र स्थायिक झाले आहेत. जुने भाडेकरू जीव मुठीत धरून राहत आहेत. जाचक आणि अत्यंत त्रासदायक अशा नियमांचे ओझे मागील काही दशकांपासून या परिसरातील नागरिकांना वाहावे लागत आहे. प्रसंगी नागरिकांना गंभीर आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. देशातील सुमारे साडेतीनशे ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील लाखो बांधकामांचा हा प्रश्न आहे. पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करून नियम शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
विमानतळ परिसरातील बांधकामांवरील निर्बंध
पुणे विमानतळ परिसरातील बांधकामांच्या परवानगीबाबत संरक्षण आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काही निर्बंध घातले आहेत. त्याचा अभ्यास करून ते शिथिल व्हावेत यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीन असे आश्वासन मोहोळ यांनी दिले.