पुणे- सामाजिक बांधिलकीची भावना लक्षात ठेऊन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे प्रमुख व शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वतीने संस्थेचे कर्मचारी वै. गणेश मोकाशी यांच्या पत्नी स्वप्नाली मोकाशी यांना ३ लाख रुपयांचा धनदेश आणि २१ हजार रूपये रोख सोपविण्यात आले. तसेच, आश्वासन देण्यात आले की भविष्यात संस्थेकडून वेळोवेळी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल. कोथरूड येथील एमआयटीच्या डब्ल्यूपीयूत आयोजित या कार्यक्रमात गणेश मोकाशी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कर्मचार्यांच्या हितासाठी सतत कार्यरत माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आजपर्यंत कर्मचार्यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाबरोबरच सर्वतोपरी मदत केली आहे. यातील बरेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर व सरकारी सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच काही विद्यार्थी कारखानदार बनले आहेत.
संस्थेचे कर्मचारी गणेश मोकाशी(३८) गेल्या ८ वर्षांपासून चालक या पदावर कार्यरत होते. प्रामाणिक व सेवाभावी वृत्तीने सेवा देणारे मोकशी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी यासाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर सर्व कर्मचार्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. तसेच, एमआयटी शिक्षण संस्थेने यात आणखी काही रूपयांची भर टाकली. असे ३ लाख रूपयांचा धनादेश व २१ हजार रूपये रोख स्वप्नाली मोकाशी यांना सोपविण्यात आले.
ही मदत निधी संकलनासाठी गणेश देवडकर, योगेश पारखी, राजू जाधव, प्रभाकर गोरे, निलेश धावरे व समीर रावडे यांनी विशेष प्रयत्न केला आहे.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते स्वप्नाली मोकाशी यांना धनादेश देण्यात आला. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव गणेश पोकळे, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. रोहिणी काळे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.