तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही पडू शकते

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- “युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडणे, धर्म आणि वर्चस्व सिद्ध करण्यावरून देशा देशात निर्माण होणार्‍या युद्धजन्य स्थितीमुळे तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. या वरुन हे सिद्ध होते की धर्म हा माणसाला वाचवूच शकत नाही. अशा वेळेस विश्वशांतीच्या ध्यासाने पेटलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ग्रंथ मानवजातीला नक्कीच नवी दिशा देईल.” असे विचार ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

डॉ. विश्वनाथ कराड माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने  नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.एस.एन.पठाण लिखित ‘विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराडः एक महान विश्वविज्ञान दार्शनिक’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी हे विशेष सन्माननीय पाहुणे होते. तसेच, शुभाशीर्वाद देण्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

यावेळी ग्रंथाचे लेखक डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि विश्वकर्मा प्रकाशनचे उपसंपादक संदीप तापकीर हे उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ डॉ. कराड यांनी सर्व धर्माच्या चांगुलपणाची बेरीज करुन ‘विश्वधर्म’ आणि ‘विश्वदेवता’ यांची नवनर्मिती करुन जगाच्या धर्म इतिहासात क्रांतिकारक बदल करीत आहेत. त्यातच डॉ. आ.ह. साळुंखे आणि पुरूषोत्तम खेडकर यांनी शिवधर्माची व डॉ. विनायक तुमराम यांनी निसर्ग आदिवासी धर्माची स्थापना केली. पण डॉ. कराड यांनी सर्वच धर्माची मूल्यात्मकता व मानदंड धर्माशिवायाच्या कला, तत्वज्ञान, विज्ञान प्रवाहातून एकत्र एकात्म करण्याच्या विश्वव्यापी प्रयोग केला. विश्वधर्म विज्ञानवादी आहे तसेच तो अध्यात्मनिष्ठ सुद्धा आहे. त्यामुळेच विश्वधर्माच्या अधिष्ठानात विश्वाच्या नकाशातील सर्व संतांचे संतत्व, सर्व देवतांचे देवत्व आणि असामान्य माणसांचे आदर्श मनुष्यत्व एकात्म आहे. एवढी भव्य दिव्य जीवन जाणीव केवळ विश्वशांती विद्यापीठाच्या प्रयोगशील व कृतीशील ध्येयवादातूनच जगभर पेरली जात आहे. ”

डॉ. सदानंद मोरे म्हणाले,“ जगात शित युद्ध सुरू आहे. अशा वेळेस विश्वशांतीची गरज मोठ्या प्रमाणात आहे. डॉ. कराड यांनी उभारलेल्या वास्तू पाहिल्यावर अद्भूत रस तयार होतो व त्यातूनच शांती रसाची निर्मिती होते. महाराष्ट्रातील संतांनी संपूर्ण विश्वाचा विचार केला आहे. ही वैश्विकता सैद्धांतीक  पातळीवर समोर आणायचे कार्य होणे गरजेचे आहे. ज्ञानोबा तुकोबाचे तत्वज्ञान संपूर्ण जगभर पोहचविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड हे कार्य करीत आहे. ”

डॉ. मिलिंद जोशी म्हणाले,“ रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना चार तत्वे दिले होती. त्यात अध्यात्म, विविध धर्माचे तत्व एक आहेत, सेवा, त्याग आणि व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाची व्याप्ती. या तत्वांमुळे समाज हा समृद्ध होतो. माणसातील दिव्यत्वाचा परिचय करुन देण्याचे कार्य धर्मांच्या तत्वांचे आहे. डॉ. कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्माच्या समावेश करुन जीवनरहस्य सांगितले. आज समाजाचे विघटन होतांना त्यांचे विचार अत्यंत महत्वाचे आहे.”

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ माझ्यावर लिहिलेल्या या पुस्तकाच्या विक्रितून मिळणारी राशी ही गरीब मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी करावा. ज्ञानोबा तुकोबांच्या आशीर्वादाने गरुड स्तंभ, विश्वरूप दर्शन मंच, राम रहिम सेतू, बुद्ध विहार, बद्रीनाथ येथील श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर आणि जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची निर्मिती झाली आहे. २१ शतकात भारत हा विश्वगुरू बनून जगाचे नेतृत्व करेल. कदाचित त्याच दिशेने हे सर्व कार्य माझ्या कडून घडत असावे.”

राहुल विश्वनाथ कराड,“ ४० वर्षात अप्रतिम शैक्षणिक कार्य व विश्वशांतीचा विचार मांडणारे डॉ. कराड यांचे विचार जगभरातील २५ ते ३० विद्यापीठांमध्ये राबविल्या गेले पाहिजे. विज्ञान, शिक्षण व विश्वशांती यावर आयुष्यभर कार्य करणारे यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग शिखरासारखे आहे.”

डॉ.एस.एन.पठाण म्हणाले,“ डॉ. विश्वनाथ कराड यांचे संपूर्ण जीवनच एक विश्वशांतीची प्रयोगशाळा आहे. त्यांचे व्यक्तीत्व हे प्रभावित करणारे असून त्यांच्या ४० वर्षाच्या काळातील शैक्षणिक प्रयोग या ग्रंथात नमूद केले आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला धाडसाची झालर आहे. शांती निकेतन रविद्रनाथ टागोर यांनी उभे केले तर डॉ. कराड हे विश्वशांती निकेतन उभे करण्यासाठी धडपडत आहेत.”

प्रा.डॉ. संजय उपाध्ये प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.

प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *