अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास पाहिला धर्मावर आधारित इथं लढाई झाली नाही, पण मधल्या काळात काळात काही मतभेद निर्माण केले गेले किंवा ते जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत. मतभेदामुळे अभिमानाला धक्का लागून अहंभाव उफाळून येतो. मतभेद संपवायचे असतील, तर आपल्या मूळ जोडण्याच्या भारतीय परंपरेचं काम वाढवावं लागेल, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया (Abhay Firodiya) यांनी व्यक्त केलं.

सरहदच्या (Sarhad) वतीने कारगिल विजय दिनाच्या (Kargil Victory Day) रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. तसंच कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉननिमित्त २०२३ (Kargil International Marathon) च्या राष्ट्रीय कारगिल पुरस्कारांचे (National Kargil Award) वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लडाख पोलीस, लडाख ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौंन्सिल यांच्यासहकार्याने एस.एम.जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ आणि वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, (Chandrakant Patil) सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार,(sanjay Nahar) विश्वस्त शैलेश वाडेकर,(shailesh Wadekar) संत सिंग मोखा (saint sing mokha) उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर,(Dr. Madhuri Kanitkar) पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, (Dr. Pratapsinha Jadhav) एस.के.आय.सी.सी. काश्मिरचे शाहनवाज शाह, शौर्य चक्र विजेते कर्नल वेंबू शंकर, पुण्यातील वॉर मेमोरियलचे शिल्पकार कै. प्रकाश कर्दळे (मरणोत्तर) यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

फिरोदिया म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीला समाज, कुटुंब आणि देशाबद्दल अभिमान आहे, तर या देशात विविध समस्या का आहेत? अभिमानात दोष असेल तर अहंकात तयार होतो. मीच श्रेष्ठ आहे, ही भावना अहंकारात रुपांतरित होते, तेव्हाच विविध समुदायांत, जातिधर्मांत, देशांत तेढ निर्माण होते. शत्रूवर विजय मिळवण्याला वीर म्हटलं जातं आणि शत्रूत्व नष्ट करतात त्यांना महावीर म्हटलं जातं. आपल्या देशात विविध धर्म असले तरीही सर्व धर्मांची मूल्यात्मक व्यवस्था ही एकच म्हणजे जोडण्याचीच आहे.’

पाटील म्हणाले, ‘वाईटाच्या विरुद्ध नेहमी रचनात्मक पद्धतीनं संघर्ष केला पाहिजे. कारगिल भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठी सरहद याच रचनात्मक पद्धतीनं काम करत आहे. रचनात्मक काम करायचं असेल तर आपण ज्यांच्यामुळं सुरक्षित आहोत, अशा सीमेवरील जवानांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येकानं तरुण वयात किंवा निवृत्तीनंतर किमान दोन वर्ष तिथं जाऊन काम केलं पाहिजे.’

कानिटकर म्हणाल्या, ‘मी आणि माझे पती दोघंही संरक्षणदलात कार्यरत होतो. एकमेकांपेक्षा वेगळं राहून मोठं होण्यापेक्षा एकत्र होऊन मोठं होऊयात, ही भावना असली तरीही वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असल्यानं आम्हाला २६ वर्षं वेगवेगळं राहावं लागलं. म्हटलं तर हा त्याग आहे. पण आम्हा दोघांच्याही मनात ‘देश प्रथम’ हीच भावना होती आणि आहे. त्यात मी, मला असं काहीच आलं नाही. जे करायचं ते देशासाठी, हीच आमची जीवनशैली बनली आहे.’

जाधव म्हणाले, ‘कितीही विद्वेष, मतभिन्नता आणि मतभेद असले तरीही देशावर संकट आलं की आपण कसे एक होतो, हे कारगिल युद्धात आपण अनुभवलं आहे. देश म्हणून पुढं जायचं असेल तर सद्‌भावना, एकात्मता देशभर सातत्यानं नांदली पाहिजे.’

यावेळी शाहनवाज शाह यांनी मनोगत व्यक्त केले. कर्नल वेंबू शंकर यांना पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता न आल्यानं त्यांची शुभेच्छा फीत रसिकांना ऐकवण्यात आली. प्रकाश कर्दळे यांच्या वतीनं प्रसन्न केसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. संतोष चोरडिया आणि निरजा आपटे यांनी निवेदन केले. मा.शैलेश पगारिया, अनुज नहार यांनी स्वागत तर आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *