पुणे(प्रतिनिधि)–‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत. त्यामुळे आमचा मुरलीअण्णांना पाठिंबा आहे,’ अशा भावना हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, त्यांच्या भावनांना उत्तर देताना मोहोळ यांनी, ‘तुमच्या कोणत्याही विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही,’अशी ग्वाही दिली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे शहरातील एकूण २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हिंदू जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व प्रभू श्रीराम यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या मेळाव्याचे प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणुन संघटित राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत कितीतरी जण मनमोकळं बोलत होते. इथं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे अनेक लोक निवडणूक म्हटली की आपल्या अपेक्षांचं गाठोडं घेऊन उभीच असतात. यांनी मात्र ‘आधी प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आणू, मग त्यांना हक्काने अपेक्षा आणि कामं सांगू. मुळात अण्णाला कामं सांगावीच लागत नाहीत. ती होतातच,’ असं आवर्जून विश्वासानं सांगितलं.
त्यांच्या भावनांना उत्तर देताना मोहोळ म्हणाले, ‘तुमच्या कोणत्याही विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही,’ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात, हे ऋणही कधीच विसरणार नाही. पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरंटी देतो, अशीही ग्वाही दिली.
या मेळाव्याला किशोर चव्हाण, पराग ठाकूर, दीपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे, संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनीही मनोगत व्यक्त कले. महेश पवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.