पुणे—महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षांच्या आतापर्यंत ८५ टक्के उत्तर पत्रिका तपासून पूर्ण झाल्या असून दहावी आणि बारावीचा निकाल ५ जून पूर्वी लागण्याची शक्यता आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आहेत. तसेच ५६ ट्रान्स जेंडर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.ही परीक्षा राज्यभर ५ हजार ८६ केंद्रांवर घेण्यात आली.
तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडली. राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये ८ लाख २१ हजार ४५० विद्यार्थी तर ६ लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थिनी आहेत. विज्ञान शाखेतून ७ लाख ६० हजार ४६, कला शाखेतून ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेतून ३ लाख २९ हजार ९०५, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) शाखेतून ३७ हजार २२६ आणि टेक्निकल सायन्स शाखेतून ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात ३ हजार ३२० केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली.
सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन माध्यमातून बोर्डाकडे पाठवले आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागतो. तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यावर्षी दोन्ही वर्गाचे निकाल ५ जून पूर्वी लागण्याची शक्यता बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.