Vanchit and MIM BJP's B team

वंचित आणि एमआयएम भाजपची बी टीम – तुषार गांधी : डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा  आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. वंचित आणि एमआयएमच्या  विरोधात अधिकाधिक प्रचार करून त्यांना मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले जाणार असल्याचे तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीत सहभागी होऊन वंचितने निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास  आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील केली जात होती. मात्र, जागावाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे कारण पुढे करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे. वंचित विकास ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याने महाविकास आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला असल्याचा आरोप गांधी यांनी केला. वंचित भाजपला मदत करत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला मतदान करू नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर आवाहन गांधी यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना

महाराष्ट्रातील  मतदारांना आवाहन करण्यासाठी तुषार गांधी यांनी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना केली आहे. या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत ⁠महाविकास आघाडीला मतदान करा, महायुतीला मतदान करू नका, असे आवाहन केले जात असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक तसेच चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे गांधी म्हणाले. राज्यातील विविध मतदारसंघांत फिरून महायुतीला मतदान न करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *