पुणे:– भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत एक मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवत आहे अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवणारे दुसरे मुख्यमंत्री कोण? हे तुम्हीच ओळखा अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही काही काळजी करण्यासारखं नाही असे सांगितले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी असून परिस्थिती भयावह आहे.
राज्य सरकारने विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्याच्यावेळी आढावा बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंधआणले आहेत त्याबद्दल बोलताना पाटील यांनी ‘कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही’ असा टोला लगावला. जास्तीत जास्त काय होणार? विरोधी पक्षनेत्याच्या प्रवासावर तर कोणी मर्यादा आणू शकत नाही. फक्त तुम्ही त्यांच्या आढावा बैठकांवर मर्यादा अनु शकता. परंतु, विरोधी पक्ष नेत्यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. त्यामध्ये ते काय बोलायचे ते तर कोणी रोखू शकत नाही असे सांगत राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ चा कुठलाही विचार आमच्या डोक्यात नाही. राज्यातील महाविकास आघाडीतील तीन पक्षांचाच एकमेकांवर विश्वास नाही. त्यामुळे ते स्वत:ला आणि कार्यकर्त्यांना सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही आणि हे सरकार पडणार नाही तर पाच वर्षे टिकेल असे सांगत आहेत. परंतु गर्जेल तो पडेल काय? हेही महत्वाचे आहे असे ते म्हणाले.