पुणे(प्रतिनिधि)—“हो माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. अशा शब्दांत जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर मध्ये जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आले तेच आता माझ्याबद्दल काय बोलतात? एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाल्याच सांगत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.
पवार म्हणाले की, पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांचा विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहात हे नक्की. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातो आहे असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधींना शहाबजादे क्या करेंगे? असे म्हणताना मोदींना काहीतरी वाटायला हवं
राहुल गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना काहीतरी वाटायला हवं, अस शरद पवार म्हणाले. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आजींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलत आहेत. खोट्या गोष्टी सांगत आहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.