मुंबई–वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत विविध आंदोलन, पत्र व्यवहार सनदशीर मार्गाने शासन/प्रशासन पातळीवर प्रयत्न करून सकारात्मक प्रतिसाद शासनाने दिला नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधीसह हजारो कामगार उपस्थित होते.
कामगारांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वीज कंपनीतील भरती मध्ये वयोमर्यादेत देखील वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSC च्या मार्क मेरिट नुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या वारसाला नोकरी मिळावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज कार्यरत अनुभवी कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ना.ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी. कंत्राटदारांच्या चौकश्या व्हाव्यात या मागण्या साठी हे आंदोलन करण्यात आले
या प्रसंगी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऊर्जा उपसचिव मा. वाळुंज, यांनी संघटनेच्या शिष्ट मंडळास पाचारण केले यामध्ये कामगार महासंघाचे मार्गदर्शक श्री अण्णा देसाई, अध्यक्ष नीलेश खरात,सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते. या वेळी लवकरच मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून कंत्राटी कामगारांचे मागण्या बाबतीत निर्णय करण्यात येईल असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे मागण्या बाबतीत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा संघटनेला राज्य व्यापी आंदोलन करावं लागेल असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ) चे अध्यक्ष नीलेश खरात यांनी आझाद मैदानावर आंदोलन प्रसंगी दिला आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष अमर लोहार, तात्या सावंत ईतर विविध जिल्हा पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.