पूजा वनदुर्गांची : हिरकणी जास्वंदा


नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या स्वयंप्रेरित ‘वनदुर्गां‘ची आपणास माहिती नसते. नवरात्रीच्या निमित्ताने अशाच काही वनदुर्गांचा परिचय…

                                हिरकणी जास्वंदा

एका जनजातीय, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या परिवारातील जास्वंदा विवाहाच्या आधीपासून वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात आली. जास्वंदा अमरूजी टेकाम, मूळची राहणारी गडचिरोलीजवळच्या कंटगटोल्याची. आपल्याला काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचंय अशी चमक कायम तिच्या डोळ्यात होती.

आधीच नक्षलग्रस्त भागात राहणारी ही मुलगी. त्यात कल्याण आश्रमात आल्यावर विविध संघ प्रचारकांशी, कार्यकर्त्यांशी परिचय झाला. त्यांचे राष्ट्राप्रती समर्पित, ध्येयवादी जीवन पाहून कल्याण आश्रमासाठी पूर्णवेळ निघायचे हे तिने मनात पक्के केले होते.

एकमेकांना प्रसंगानुरूप सहकार्य करणं, एकोप्याने राहणं, सुखदुःखात सहभागी होणं हे बालपणापासूनच हिच्या मनावर कोरलं गेलं होतं आणि जसा वनवासी कल्याण आश्रमाचा परिसस्पर्श झाला तसं तिचं जीवनच बदलून गेलं.

अधिक वाचा  माझा मित्र गेला

बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून जास्वंदाने कामाला सुरुवात केली. दुर्गम भागातील वनवासी मुले शिकावीत म्हणून कल्याण आश्रमाचा अनेक गावांमध्ये चालणारा महत्वाचा प्रकल्प आहे. यानिमित्ताने अनेक गावांत केलेला प्रवास, या संस्कार वर्गात घडत असलेली मुले हे सगळे लक्षात घेऊन जास्वंदाला प्रयास, सेवांकुर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एका पूर्णकालीन सक्रिय कार्यकर्तीला असा पुरस्कार मिळणे गौरवाची बाब आहे. किंबहुना कल्याण आश्रमाचाच तो गौरव आहे.

आधीच कल्याण आश्रमाचा कार्यकर्ता असलेला पंढरी दररो यांच्याशी लग्नगाठ बांधून जास्वंदाने सहचाऱ्यासह सामाजिक कार्यातील सहभागाची गाठ पक्की केली.

हळद उतरण्याच्या आतच लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासून दोघे कामाला लागले होते, हे विशेष. अर्थात कार्यात येण्यासाठी आपला सर्वांना जोडून ठेवण्याचा प्रेमळ स्वभाव,घरच्यांचे सहकार्य पूरक होते.

विवाहानंतर जास्वंदा मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषय घेऊन बी. ए. झाली. तिला दोन मुले आहेत. मुले अत्यंत लहान असताना, त्यांना सांभाळून कार्य करणे, प्रवास करणे, प्रसंगी सर्व माहेरची व सासरची माणसे यांना जपणे, त्यांच्याही सुखदुःखात सहभागी होणे ही तारेवरची कसरत जास्वंदाने लीलया पार पाडली. तळमळीने मनापसून काम करतांना एका मोठ्या विचित्र प्रसंगाला तिला सामोरे जावे लागले.

अधिक वाचा  पर्वती विधानसभेसाठी श्रीनाथ भिमाले यांची मोर्चेबांधणी  

तिचा मुलगा हर्षल सहा महिन्याचा असताना त्याला घरात ठेऊन बाल संस्कार वर्गाच्या कामासाठी पोहरी मट्टामी या कार्यकर्तीसोबत जास्वंदा सेविकांना भेटायला काकरगटा या गावी गेली होती. सेविकांच्या व्यवस्थित भेटी झाल्या, पण येताना थोडा उशीरच झाला, येताना वाहन नव्हते. बाळाची काळजी वाटायला लागली होती. त्यात एक खाजगी गाडी मिळाली. थोडे अंतर गेल्यावर वाहनचालक नको ते प्रश्न आणि विचित्र नजरेने पाहत वारंवार त्यांना त्रास देऊ लागला. त्यात तो स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असताना जास्वंदामधील हिरकणी जागी झाली. तिने बळाचा वापर करत कशीबशी गाडी थांबवली आणि दोघींची सुटका करून घेतली. प्रसंगी खंबीर आणि कणखर होत अनेक वनवासी कार्यकर्त्या तिने तयार केल्या. गावागावात जाऊन वनवासीं कल्याण आश्रमाचे कार्य सांगितले. गावांतील महिलांना आपलेसे केले.

वयाच्या 16व्या वर्षी बालसंस्कार वर्ग चालविण्याच्या हेतूने कल्याण आश्रमकार्यात आलेली एक मुलगी आपल्या कर्तृत्वाने आज विदर्भ प्रांताची महिला कार्यप्रमुख झाली आहे. संपूर्ण विदर्भासह नक्षलग्रस्त गावात (गडचिरोली जिल्ह्यात) तिचे जाणे असते. तेथील तरुणींना आपल्या कार्यात जोडणे, विविध शिबिरं घेणे, संमेलनांचे आयोजन करणे, बचत गट चालवणे, युवती चेतना शिबीर, परिचय वर्ग अशा कल्याण आश्रमांतर्गत चालणाऱ्या अनेक उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो. कुरखेडा, अहेरी, भामरागड या तीन ठिकाणी आपले वसतिगृह आहेत. नक्षलग्रस्त भागातील मुले आपल्या वसतिगृहात शिकावित, त्यांच्यावर शालेय संस्कार व्हावेत, ती मुले शिकून मोठी व्हावीत यासाठीसुद्धा ती प्रयत्न करत आहे. अनेक कार्यकर्त्यांची फौज तिच्यासोबत आहेच.   प्रवासात, या कार्यात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करत जास्वंदा धैर्याने पुढे जाते आहे….

अधिक वाचा  गीता आणि दासबोध

माळरानात फुलणारे फुल नेहमीच ताजे, टवटवीत, मनाला प्रसन्नता देणारे, मनमोहक, हसरे व आपला उत्साह वाढविणारे असते.  तसेच हे जास्वंदा नावाचे वनवासी फुल, मुळातच असलेली जिद्द, मनात देशभक्तीची भावना, काहीतरी चांगले करण्याची धडपड व पतीची भक्कम साथ असेल तर कल्याण आश्रमाच्या परीस स्पर्शाने कसे दिमाखात उभे राहते, याचे उत्तम उदाहरण….

जनजाती समुदायातून जास्वंदा हिच्यासारखी अनेक फुले तयार व्हावीत हीच मनोकामना…

वैशाली देशपांडे

पश्चिम क्षेत्र महिला कार्य सहप्रमुख वनवासी कल्याण आश्रम

( विश्व संवाद केंद्र, पुणे)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love