ठमाताई पवार : वनवासी समाजासाठी आदर्श महिला: कार्यातून उमटवला प्रेरक ठसा


नवरात्रीला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्रात  देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरात, आसपास आढळतात. आपण दखल घ्यायलाच हव्यात अशा, तसेच समाजाकडून काहीवेळा दुर्लक्षित तर काहीवेळा न्यूनगंड असल्याने पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, ज्ञानाचे भांडार असलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या शक्तीची पूजा करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा वनदुर्गांची आपणास माहिती नसते. अशाच काही वनदुर्गांचा परिचय नवरात्रीच्या निमित्ताने करून देत आहोत. त्यांची ऊर्जा, आपल्या संस्कृशीची जुळलेली घट्ट नाळ या निमित्ताने समाजासमोर आणण्याचा हा प्रयत्न…

माणसाचा जन्म कुठेही झाला असला तरी त्याने केलेल्या कार्यामुळे त्याची ओळख समाजाला होत असते. कातकरी समाजातून पुढे आलेल्या ठमाताई पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. आश्रम शाळेमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जोडल्या गेलेल्या ठमाताई यांनी तेथेच शिक्षण घेत केवळ स्वतःची प्रगती साधली नाहीतर आश्रमशाळेच्या विस्तारासाठी मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे ठमाताई महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

अधिक वाचा  धंगेकरांवर ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ : पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकरांना ग्रासले

*कर्जत*(जि. रायगड) या आदिवासी तालुक्यातील रहिवाशांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे मजुरी करणे. त्यामुळे गावातील सर्वच कुटुंबात गरिबी. अशाच एका कुटुंबात ठमाताई यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काहीतरी काम मिळेल का, या उद्देशाने त्यांच्या सासूबाईंनी त्यांना वसतिगृहात आणले आणि ठमाताई कल्याण आश्रमाच्याच होऊन गेल्या. घराला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांनी जांभिवली (ता. कर्जत) गावातील वनवासी कल्याण आश्रमात स्वयंपाक करण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला त्या भाकरी करायच्या. भजन म्हणण्याची, शिकण्याची अत्यंत आवड असल्याने मातीवर, पिठावर अक्षरं गिरवायला सुरूवात केली. त्यांची ही अक्षर ओळख आणि शिक्षणाची आस लक्षात घेऊन त्यांनाही शिकवायला सुरूवात झाली. ठमाताई साक्षर आणि त्याच बरोबर सुशिक्षित झाल्या. वाचन, लिखाण करू लागल्या. एका सर्वसामान्य कातकरी आदिवासी महिलेचे एक सक्षम, निर्भीड आणि कार्यक्षम असे व्यक्तिमत्त्व घडले. यामध्ये कल्याण आश्रमाचा महत्त्वाचा वाटा आहे.

अधिक वाचा  सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" का म्हणावे ?

महिलांमध्ये जागृती

सामाजिक कार्याची मुळातच आवड असलेल्या ठमाबाई यांना समाजासाठी काही करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी भजनातून व्यसनाधीनता रोखण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी, साक्षरता, आरोग्य या विषयी जागृती करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आदिवासी पाड्यांवर बालवाड्या सुरू केल्या. घरोघरी फिरून मुलांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त केले. भजन आणि कीर्तनाचा वापर करून त्यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण केली. महिलांमधील व्यसनाधीनतेची जाणीव त्यांना अस्वस्थ करत होती. त्यातूनच दारूबंदीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. महिलांमधील व्यसनाधीनतेचे कारण शोधून त्यावर उपाययोजना काय असू शकते याचा शोध घेतला. रोजगार मिळत नसल्याने व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना व्यसनांपासून दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आदिवासींच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन आर्थिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धही त्यांनी संघर्ष उभा केला.

कार्याची दखल

याच कामाची दखल घेऊन वनवासी कल्याण आश्रमाने ठमाताई यांना  संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेतले. महाराष्ट्रातील १८ आश्रम शाळा आणि  त्या परिसरातील शिक्षण प्रसार,  आदिवासींचा सर्वागीण विकास साधण्यासाठी त्या काम करत आहेत. सध्या त्या  कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांताच्या अध्यक्ष आहेत.  

अधिक वाचा  डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

थेट काम

एकदा महिलांची बैठक कोटा (राजस्थान) येथे होती . तेथे तुंबलेले बाथरूम अणि होणारी गैरसोय  ठमाताईनी  पाहिली आणि पटकन त्या पुढे झाल्या, सरळ हाताने जाळी काढत आपला दंडापर्यंत हात आत घातला आणि  सगळा कचरा बाहेर काढला आणि कचऱ्याच्या डब्यात टाकला. एवढ्या वेळचे तुंबलेले पाणी क्षणात वाहून गेले. प्रसंग आला आणि त्यांनी तो निभावला. त्यांच्या चेहऱ्यावर ‘मी केले” हा भाव मात्र अजिबात नव्हता, लगेच शुचिर्भूत होऊन त्या निघूनही गेल्या. प्रसंग काळ वेळ बघत काम करून मोकळ्याही झाल्या. त्यांच्यातील सहज प्रवृत्तीची अनुभूती अनेक कार्यातून कायमच येत असते.

आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वसामान्य माणसातील असामान्य  कर्तृत्व असणाऱ्या या आधुनिक देवीचा  हा परिचय.

ठमाताई या वनदुर्गेच्या कार्याला त्रिवार वंदन.

वैशाली  देशपांडे

निगडी, पुणे

(विश्व संवाद केंद्र,पुणे प. म प्रांत  द्वारा प्रकशित)

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love