आपली कला जगभरात पोहोचविण्यासाठी ‘आर्ट प्रेझेंट’ करणार चित्रकार आणि शिल्पकारांना मदत

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे: कोरोना महामारीचा फटाका हा जगभरातील बहुतांश क्षेत्रांबरोबरच चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला क्षेत्रांना देखील बसला. या काळात परदेशात व्हर्च्युअल माध्यमातून प्रदर्शनांचे आयोजन झाल्याने रसिक व कलाकार तारले गेले. मात्र, भारतात ही परिस्थिती दिसून आली नाही. कोरोनानंतर नजीकच्या भविष्यात देखील व्हर्च्युअल क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे. याद्वारेच भारतातील कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींना परदेशी कलासक्त रसिकांपर्यंत पोहोचवित या कलाकृतींना हक्काचे व्यासपीठ व रसिकांची दाद मिळून भारतीय कलाकारांना परदेशात रिप्रेझेंटेशन अर्थात ओळख मिळावी या हेतूने पुण्यातील निरंजन इंगळे यांनी ‘आर्ट प्रेझेंट’ (Art PRESENT) या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. निरंजन हे मूळचे पुण्याचे असून पेशाने ते संगणक अभियंते आहेत.

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय कलाकृतींना अमेरिका व युरोपमधील इतर मोठ्या बाजारपेठांपर्यंत व्हर्च्युअली पोहोचवित कलाकारांच्या कलेची ओळख निर्माण करीत त्यांना सुयोग्य असे व्यासपीठ देण्याचे काम या संकल्पानेद्वारे करणार असल्याची माहिती ‘आर्ट प्रेझेंट’ या व्यासपीठाचे जनक निरंजन इंगळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भांडारकर रस्त्यावरील आर्ट पुणे फाउंडेशनच्या गॅलरीमध्ये सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.   

आर्ट पुणे फाउंडेशनचे संस्थापक संजीव पवार, ‘आर्ट प्रेझेंट’ या व्यासपीठाच्या मदतीने येत्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील हॅम्प्टन्स फाईन आर्ट फेअरमध्ये सहभागी होण्या-या प्रसिद्ध चित्रकार माधुरी भादुरी व एम नारायण आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना निरंजन इंगळे म्हणाले की, “मागील काही वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असताना अनेक आर्ट फेस्टिव्हल्स व प्रदर्शनींना भेट देण्याचा योग आला. या दरम्यान प्रसिद्ध मास्टर्स सोडल्यास इतर भारतीय कलाकारांच्या कला तेथे प्रदर्शित होत नसून अनेक प्रतिभावान चित्रकार व शिल्पकरांना अपेक्षित तेवढे रिप्रेझेंटेशन मिळत नसल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. त्यानंतर आलेल्या कोरोनाने प्रदर्शनांमधील शारीरिक उपस्थितीवर देखील मर्यादा आणल्या. मात्र व्हर्च्युअल गॅलरी सारखी नवी दालने कलाकार व रसिकांसमोर उघडू लागली. याचाच फायदा भारतीय चित्रकार, कलाकारांना व्हावा व त्यांना आपली कला जगभरातील रसिकांसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘आर्ट प्रेझेंट’ या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. या व्यासपिठाद्वारे कलाकारांना आपली कला व्हर्च्युअली जगभरातील गॅलरी व रसिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होत आहे. माझा संपर्क हा अमेरिका व युरोपमधील कला उद्योगाशी असल्याने या व्यासपिठाद्वारे त्या ठिकाणी न जाता देखील कलाकारांना आपली कला प्रदर्शित करता येणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, भारतीय कलाकारांच्या कलेला जगातील विविध भागात घेऊन गेल्यानंतर कोणत्या भागात, कोणत्या कलाकाराची कोणती कला रसिकांना आवडत आहे, हा डेटा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही गोळा करीत त्याचे डेटा अॅनॅलिटिक्सद्वारे विश्लेषण करणार आहोत. यामुळे कोणत्या शहरातील रसिक हे कोणत्या कलाप्रकाराचे चाहते आहेत याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. या माहितीच्या आधारे कोणाची कला कोठे प्रमोट करायची हे निश्चित होईल. योग्य ठिकाणी योग्य कला प्रदर्शित झाल्याने त्याचा फायदा कलाकारांना तर होईलच शिवाय गुणवत्ता असलेला कलाकार आपल्या गॅलरीमध्ये उपलब्ध होत असल्याने आर्ट प्रमोटर्स व गॅलरींचा देखील याला सकारात्मक पाठींबा मिळेल. शिवाय ऑगमेंटेड रिॲलिटीद्वारे ही चित्रे पाहता येणे शक्य असल्याने कलाकृतींची खरेदी करणे ग्राहकांसाठी देखील सोपे होईल, असा यामागील विचार आहे.       

या व्यासपीठासाठी आजवर १६ कलाकारांनी नोंदणी केली असून त्यांच्या कला आम्ही अमेरिका व युरोपमधील महत्त्वाच्या गॅलरींमध्ये घेऊन जात आहोत. भविष्यात या कलाकारांना त्या त्या भागात प्रमोट करण्यासाठी आम्ही काम करू, जेणेकरून त्यांचे प्रोफाईल तयार होऊन त्यांच्या कलेला दाद मिळू शकेल. सध्या पुणे आणि परिसरातील चित्रकार, शिल्पकार यांना या व्यासपीठाचा फायदा होत असून नजीकच्या भविष्यात संपूर्ण देशातील कलाकारांसाठी ते उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे निरंजन इंगळे यांनी सांगितले. या व्यासपीठाच्या माध्यमातून पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार माधुरी भादुरी व एम नारायण यांना येत्या सप्टेंबर मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात होणा-या हॅम्प्टन्स फाईन आर्ट फेअरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद आहे, असेही इंगळे म्हणाले. 

चित्रकार, शिल्पकार हा आपल्या कला जोपासण्याबरोबरच कलाकृतीच्या निर्मितीमध्ये गुंतलेला असतो, त्यामुळे    ब-याचदा आपली कला रसिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना अडचणी येतात. यासाठी एका सुयोग्य व्यासपीठाची गरज असून आर्ट प्रेझेंट द्वारे आता ते उपलब्ध होत असल्याचा आनंद संजीव पवार यांनी व्यक्त केला.

प्रत्येक चित्रकाराला त्याच्या कलेच्या गुणवत्तेचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी निरंजनसारख्या युवा पिढीकडून होत असलेले हे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. भारतीय कलाकारांची कला याद्वारे जगभरात तर पोहोचेलच याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कलाकारांच्या कलेचा एक डेटा तयार होण्यास सुरुवात होईल. भविष्यात हा डेटा कलाकार, रसिकांसाठी महत्त्वाचा ठरेल, असे मत चित्रकार माधुरी भादुरी यांनी व्यक्त केले.

चित्रकार एम.  नारायण म्हणाले, “कलेत बुडून गेलेल्या प्रत्येक कलाकाराला जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचणे हे एका स्वप्नासारखे असते. आर्ट प्रेझेंटच्या माध्यमातून हेच स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे. याद्वारे मिळणारी जगभरातील रसिकांची दाद आमचीसाठी महत्त्वाची आहे.”

आर्ट प्रेझेंट हे एक सॉफ्टवेअर टूल असून त्याद्वारे कलाकाराला व्हर्च्युअल गॅलरी तयार करून देण्यात येते. यामध्ये कलाकार स्वत: आपली चित्रे अपलोड व डिस्प्ले करू शकतात. शिवाय त्यांना ‘आरंभ’ व ‘आर्टस्टोरीज’ या दोन व्हर्च्युअल प्रदर्शनींमध्ये देखील सहभागी होता येते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १६ ऑगस्ट पासून ‘आरंभ’ व ‘आर्टस्टोरीज’ या दोन व्हर्च्युअल प्रदर्शनींचे आयोजन आर्ट प्रेझेंटच्या वतीने करण्यात आले असून यातील आरंभ अंतर्गत अॅबस्ट्रॅक्ट चित्रांचा तर आर्टस्टोरीज अंतर्गत फिगरेटिव्ह व भारतीय विषयांवरील चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विवेक निंबोलकर, सचिन पकले, हर्षित बोंद्रे, गायत्री देशपांडे, पांडुरंग ताठे, राहुल दांगट, रामचंद्र खरातमल, रमेश गुजर व निलेश पवार आदी चित्रकारांनी सहभाग घेत आपली चित्रे प्रदर्शित केली आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *