पुणे- शालेय शिक्षण विभागाने ‘सरल पोर्टल’वर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय, जात इत्यादी माहिती घेण्यात येते.त्यामध्ये जात या रकान्यात जातींचा उल्लेख असायचा परंतु गेल्या काही दिवसांपासून या रकान्यात बदल करण्यात आला असून जात – “ब्राह्मण किंवा इतर” असे दोनच पर्याय आता दिसत आहेत. ही बाब योग्य नसून,. भविष्यात या जातीपातीची विभागणी करुन ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देण्याचा आणि ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव करण्याचा शासनाचा मानस असल्याची शंका येते असा आरोप करत, तात्काळ या विषयात लक्ष घालून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रातील जातीद्वेष थांबवावा व या सरल पोर्टलमध्ये योग्य बदल तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय ब्रह्म अखिल महाशिखर परिषद (इं)ने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
भारतीय ब्रह्म अखिल महाशिखर परिषद (इं) उपाध्यक्ष व ब्राह्मण सेवा संघ, पुणेचे संस्थापक अध्यक्ष सु.द.ऊर्फ पप्पाजी पुराणिक यांनी शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांना याबाबतीत पत्र लिहून ही मागणी केली आहे.
पोर्टलमध्ये ब्राह्मण व इतर असे का केले हे अनाकलनीय आहे. इतर मराठा, माळी, धनगर अशा विविध जाती असताना फक्त ब्राह्मण व ब्राह्मणेतर हेच कां? ही गंभीर बाब असून यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेदभाव आपल्या शासनाकडूनच केला जातो आहे असा भ्रम निर्माण होत आहे. जातीयद्वेषाचा बळी ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आता आपले लोकशाही शासन देखील सापत्न वागणूक देणार की काय असा प्रश्न ब्राह्मण समाजाच्या मनात निर्माण होत आहे.
आपले शासन या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती घेत आहेत की ब्राह्मण जातीची माहिती घेत आहे? आपण विद्यार्थ्यांची अशी विभागणी करून आपले हे लोकशाही शासन नक्की काय साध्य करणार आहे ? असा सवाल पुराणिक यांनी विचारला आहे.
भविष्यात या जातीपातीची विभागणी करुन ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देण्याचा शासनाचा मानस असल्याची शंका येते. असे गंभीर प्रश्न व शंका यामुळे निर्माण झाल्या आहेत, असे पुराणिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याविषयात तात्काळ लक्ष घालून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रातील जातीद्वेष थांबवावा व या सरल पोर्टलमध्ये योग्य बदल तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी पुराणिक यांनी केली आहे.