१२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान

शिक्षण
Spread the love

पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मे नंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा  कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील करोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष लांबणार..

जुलैमध्ये निकाल जाहीर झाल्यावर पुढील वर्षीच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. दरवर्षी मे अखेरीपर्यंत निकाल आणि जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे पुढील शैक्षणिक वर्षही लांबणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *