कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

Spread the love

मुंबई-कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न,  ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. कोण होणार करोडपती च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघीं मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी) या संस्थेसाठी हा खेळ खेळणार आहेत. हा विशेष भाग येत्या शनिवारी ११ जून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर  प्रसारित होणार आहे.   

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ह्या दोघी सहभागी होणार आहेत. या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत,काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक,दिग्दर्शक निरंजन अय्यंगार आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागात उपस्थित असणार आहेत. काजोलला बाजिगर च्या सेटवर शाहरूख खान का ओरडला होता, तनुजा यांच्या लग्नाची बेडी या नाटकाचे अनुभव; अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग रंगलेला असल्याने प्रेक्षकांसाठी विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

अधिक वाचा  आमदार मुक्ता टिळक झाल्या कोरोना मुक्त,ट्विट करत दिली माहिती

कोण होणार करोडपती च्या या पर्वातही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींचीभेट आणि त्यांचे कार्य प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातील पहिल्याच आठवड्यातील विशेष भागात विशेष पाहुणे म्हणून तनुजा आणि काजोल या सहभागी होणार आहेत. मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी)या संस्थेसाठी या दोघी ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार आहेत.

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हीट होतो, अशी अफवा सिनेमा क्षेत्रात अनेक वर्षं आहे; त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love