पुणे- दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी ट्विट युद्ध सुरु झाले आहे. पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी याबाबत नाराजी व्यक्त करत “शेतकरी आंदोलन आमच्या देशाचा प्रश्न आहे. त्यावर तुम्ही बोलू नका” अशा प्रकारचे ट्वीट करीत उत्तर दिले होते.
दरम्यान, यावरून राजकीय नेतेही संतापले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही क्रीडा आणि कला क्षेत्रातील नामवंतांच्या या भूमिकेचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं,” अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
“आजपर्यंत महाराष्ट्रातील किंवा देशातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला, तरच आंदोलन केलं. दुधाचे भाव पडले, तरच त्यांनी आंदोलन केलं. ऊसाचे दर घसरले. केळीबद्दल काही अडचणी आल्या, सोयाबीन, कापूस यांच्याबद्दल आल्या, तरच शेतकरी रस्त्यावर येतो. त्यातून राज्यकर्त्यांनी वेळोवेळी योग्य पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे. चढउतार येतात. पण त्यातून कधी सवलत द्यायची असते, काही निर्णय घ्यायचे असतात. हे सगळं सोडून दिलं आणि खिळे मारताहेत. आता टीका व्हायला लागल्यावर काढत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी मोदी सरकारवर केली.