मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून कणकण आणि ताप आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अजित पवार यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र त्यांचे पुत्र पार्थ यांनी अजितदादांना कोरोना झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते.
दरम्यान, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मात्र, अजितदादा नाराज असल्यामुळेच तब्येतीचे कारण पुढे करून अनुपस्थित राहिल्याच्या चर्चांनाही उधान आले होते. त्यावर शरद पवार यांनी अजितला ताप होता. सर्व सहकार्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे ते म्हणाले. अजित नाराज असल्याच्या चर्चा मिडीयानेच चालवल्या असेही ते म्हणाले.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मागच्या शुक्रवारी अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांना खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता,मला काहीही माहिती नाही असे उत्तर दिले होते, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी दिली, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवार यांनी त्याचे खंडन केले आहे. मात्र, असे असले तरी दादा नाराज आहेत की नाही हे लवकरच समजेल असेही बोलले जात आहे.















