पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार

कला-संस्कृती
Spread the love

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम हे स्थगित किंवा रद्द करण्यात आले. परंतु सुमारे एक तपाहून अधिक काळ पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे.’Vasantotsav’ will be held this year without any break डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सवा’चे हे सलग १४ वे वर्ष असून महोत्सव दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान दुपारी ४ ते १० या वेळेत स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

महोत्सव यंदा डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येणार असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना रसिकांना यंदा वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपटे रस्त्यावरील हॉटेल डेक्कन रॉनदेवू येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद थोटे, आयोजन समिती सदस्य राजस उपाध्ये उपस्थिती होते. महोत्सवात धृपद गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, दक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीताचा मेळ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) पं. जसराज यांच्या शिष्या व मेवाती घराण्याच्या प्रसिध्द गायिका अंकिता जोशी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर ज्येष्ठ धृपद गायक पं. उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोपात सुजात हुसेन खान (सतार), मुकेश जाधव (तबला), रणजीत बारोट (तालवाद्य) व सहकलाकार यांचा कलाविष्कार सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी (दि. २० फेब्रुवारी) प्रसिध्द सतार वादक शाकीर खान यांचे वादन होईल. त्यानंतर  शास्त्रीय गायक विजय कोपरकर यांचे गायन होईल. हिंदुस्तानी व दक्षिणात्य शास्त्रीय संगीताचा मेळ साधत प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया व वेणू बासरीचे मास्टर शशांक सुब्रमण्यम यांचे एकत्रित बासरी वादन होणार आहे. यावेळी पं. विजय घाटे हे तबल्याची साथ करतील. या दिवसाचा समारोप प्रसिध्द शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे.

तिसऱ्या दिवशी (दि. २१ फेब्रुवारी) ज्येष्ठ तबला वादक पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव व पं. नयन घोष यांचे पुत्र व शिष्य ईशान घोष यांच्या एकत्रित तबला वादनाने सुरुवात होईल. त्यानंतर पंकज उधास यांचा  गझल गायनाचा कार्यक्रम होईल. महोत्सवाचा समारोप प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने होणार असून यावेळी त्यांच्या साथीला सारंगी वादक मुराद अली असतील.

महोत्सवाला पेट्रोकेम मिडल इस्ट, पी. एन. गाडगीळ अँड सन्स, पुनीत बालन ग्रुप, सारस्वत बँक यांचे प्रायोजकत्व आहे. तर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि रावेतकर ग्रुप, एल. अँड टी. रिअॅलिटी, ओएर्लिकोन बल्झेर्स, विलो पंप्स, जाई काजळ, मैफिल कॅटरर्स, सेतू अॅडव्हरटायझिंग, गिरिकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि. हे सहप्रायोजक आहेत.

कार्यक्रमाचे तिकीट ‘BookMyShow.com’ वर उपलब्ध आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *