प्रबोधन महोत्सवात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा होणार जागर


पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात व्याख्यान, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र-व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रबोधनकारांची ध्वनिमुद्रीत भाषणेही ऐकावयास मिळणार असून या कार्यक्रमांतून प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होणार आहे.

हा महोत्सव दि. 20 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला असून या निमित्ताने साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध विचारधारांची दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी आज (दि. 18 जानेवारी 2021) पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी उपस्थित होते.

बालगंधर्व कलादालनात प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून बुधवार दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थित होणार आहे. प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’ मालिका असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 75हून अधिक व्यंगचित्रकारांचे ‘आमचेही फटकारे’ हे व्यंगचित्रांचे प्रदर्शन ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर व इतर सादर करणार आहेत. प्रदर्शन दि. 26 पर्यंत खुले असणार आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे, शिक्षणमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब दराडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी 2 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण ऐकावयास मिळणार असून त्यानंतर प्रबोधनकार लिखित ‘महामायेचे थैमान’ या पुस्तकातील लेखाचे अभिवाचन अभिनेते शिवराज वाळवेकर करणार आहेत. त्यानंतर प्रबोधन पाक्षिकाविषयी डॉ. विठ्ठल घुले यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे असतील. तसेच कर्मयोगी प्रबोधनकार या दूरदर्शनवरील टेलिफिल्मच्या पहिल्या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राज्यातील महिला नेत्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला असून ‘प्रबोधनकार आणि स्त्रीशक्ती’ या विषयावर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, मनसेच्या महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे सहभागी होतील. त्यांच्याशी ज्योती वाघमारे संवाद साधणार आहेत.

शुक्रवार, दि. 22 रोजी दुपारी 12 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण आणि प्रबोधनकारांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन अनिनेते शंतनू मोघे करणार आहेत. डॉ. महावीर मुळे यांचे प्रबोधन पाक्षिकावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार असणार आहेत. त्यानंतर कर्मयोगी प्रबोधनकार टेलिफिल्मच्या दुसर्‍या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ‘प्रबोधनकार ठाकरे आणि आजचे तरुण’ या विषयावर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार रोहित पवार, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जलसंपदामंत्री बच्चू कडू, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग आहे. सुधीर गाडगीळ युवा नेत्यांची मुलाखत घेणार आहेत.

अधिक वाचा  कांदा,लसूनशिवाय लज्जतदार काश्मिरी दम आलू

दि. 22 व 23 रोजी प्रबोधनकार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प सुरेश राऊत साकारणार आहेत.

शनिवार, दि. 23 रोजी दुपारी 12 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण ऐकावयास मिळणार असून त्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी दिपक रेगे प्रबोधनकारांच्या ‘आई थोर तुझे उपकार’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन करणार आहेत. डॉ. नवनाथ शिंदे यांचे प्रबोधन पाक्षिकावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी महात्मा फुले वाङमयाचे अभ्यासक हरी नरके असणार आहेत. त्यानंतर कर्मयोगी प्रबोधनकार टेलिफिल्मच्या तिसर्‍या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले वडिल प्रबोधनकार यांच्या सांगितलेल्या आठवणी ‘पुत्र सांगती चरित पित्याचे..!’ ही एक तासाची ध्वनिचित्रफित प्रथमच प्रदर्शित होणार आहे. या प्रसंगी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे.

रविवार, दि. 24 रोजी दुपारी 12 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण, प्रबोधनकारांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकाचे अभिवाचन शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील करणार आहेत. त्यानंतर डॉ. मनिष देशमुख यांचे प्रबोधन पाक्षिकावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड असणार आहेत. त्यानंतर कर्मयोगी प्रबोधनकार या दूरदर्शन मालिकेच्या चौथ्या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता प्रबोधनकार आणि आजची स्थिती या विषयावर ज्येष्ठ सत्यशोधक पन्नालाल सुराणा यांचे व्याख्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत. प्रबोधनकारांनी लिहिलेल्या पाच नाटकातील ‘समाजप्रबोधनाकडे जाणारी नांदी!’ तसेच पावनखिंडीचा आणि विजयादशमीचा पोवाडा विक्रांत आजगावकर सादर करणार आहेत. चिन्मय जोगळेकर, निनाद जाधव, अंगद गायकवाड, शाहीर आझाद नायकवडी आदींचा सहभाग असणार आहे.

अधिक वाचा  गोवा लघुपट महोत्सव:‘पेनफूल प्राईड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

सोमवार, दि. 25 रोजी दुपारी 12 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण ऐकावयास मिळणार असून त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूकर प्रबोधनकार लिखित ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन करणार आहेत. प्रबोधनकार साहित्य डॉट कॉमचे ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष सुभाष वारे असणार आहेत. त्यानंतर कर्मयोगी प्रबोधनकार या दूरदर्शन मालिकेच्या पाचव्या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता प्रबोधनकारांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही ध्वनिचित्रफितींचे प्रेक्षपण करण्यात येणार असून त्यानंतर ‘असे होते प्रबोधनकार..!’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व प्रबोधनकारांचे सहकारी पंढरीनाथ सावंत यांचे व्याख्यान होणार आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांची या वेळी उपस्थिती असणार आहे.

मंगळवार, दि. 26 रोजी दुपारी 12 वाजता प्रबोधनकारांचे ध्वनिमुद्रित भाषण ऐकावयास मिळणार असून त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रबोधनकारांच्या ‘उठ मराठ्या उठ’ पुस्तकातील संपादित लेखाचे अभिवाचन करणार आहेत. त्यानंतर गंगाधर बनबरे यांचे सत्यशोधकांचे प्रबोधनकार या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दिन तांबोळी असणार आहेत. त्यानंतर कर्मयोगी प्रबोधनकार या दूरदर्शन मालिकेच्या सहाव्या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी 5 वाजता  प्रबोधन शतकोत्सव सोहळ्याचा समारोप होणार असून या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, जनसंपर्क विभागाचे महासचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 7 वाजता प्रबोधनविषयक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे व त्यांचे कविवर्य मित्र सहभागी होणार आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love