पुणे–महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी केली. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे, असं थेट आव्हानही शाह यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिलं.
पुण्यात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला
अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thakaray ) यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, असा टीका शाह यांनी केली. सरकार चालवणे जमत नसेल तर राजीनामा द्या, अशा स्पष्ट शब्दात शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवून ज्यांच्याशी लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन हात करा, जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असे आव्हान अमित शाह यांनी दिलं.
पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसनं त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं? असा सवाल शाह यांनी केलाय.
महागाई.., महागाई.. म्हणत छाती बडवून घेत होते. अचानक पंतप्रधान मोदींनी निर्णय केला की आपण पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार. कमी केले मोदींनी आता वेळ आली राज्यसरकारची त्यावर भाजपाशासीत राज्यांनी देखील दर कमी केले. एकूण १५ रुपये दर कमी झाले. मात्र यांना(महाविकास आघाडी सरकारला) कदाचित ऐकण्यात त्रास झाला की काय माहिती नाही, मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं होतं की, राज्य सरकारांनी देखील थोडा दर कमी करावा. त्यानंतर अनेक राज्य सरकारांकडून दर कमी केला गेला. मात्र यांनी तर दारूच स्वस्त केली. देशभरात पेट्रोल-डिझेल १५ रुपये स्वस्त झाले, महाराष्ट्रात का नाही झालं? उद्धव ठाकरे सरकारने याचं उत्तर द्यावं, असा त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे.” असं शाह कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.