पुणे – कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त गुप्ते मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सचिन अहिर बोलत होते. याप्रसंगी महिला आघाडीच्या संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, समीर तुपे, गजानन पंडित, आनंद गोयल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळासाहेब मालुसरे, रामभाऊ पारीख, युवासेनेचे राम थरकुडे, सनी गवते, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, ‘ही निवडणूक महाविकास आघाडी या नात्याने आपल्याला जिंकायची आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता कसबा मतदारसंघात बदल शक्य आहे. महाविकास आघाडी म्हणून धंगेकर यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही आघाडी केवळ विधानसभेपुरती नाही. ही निवडणूक अटीतटीची असून, आपल्याला प्रत्येक बूथमध्ये काम करून विजय निश्चित करायचा आहे.’
तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, ‘कसबा मतदारसंघात आपला महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे. यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्न करतील. येत्या पालिका निवडणुकीत आपले शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रवींद्र धंगेकर, संजय मोरे, विशाल धनवडे, ज्येष्ठ शिवसैनिक विजय ठकार यांचीही भाषणे झाली.