आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या भेटीवेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना कॉल सेंटर २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन यातील हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट केली जात आहे. यात आधी ५ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही’, असेही मोहोळ म्हणाले.

पुणे महानगरपालिका तयार करणार ५ हजार सीसीसी बेड्स  

पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, यावर सविस्तर आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास ७००० हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरु आहे’.

डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासही महापौरांनी सांगितले आहे.

जम्बो केंद्रामध्ये केवळ 65 खाट शिल्लकशहरातील रुग्णालयांमध्ये एकूण खाटांपैकी सध्या व्हेंटिलेटर नसलेले 360 अतिदक्षता खाट शिल्लक आहेत आणि व्हेंटिलेटर असलेले 159 अतिदक्षता खाट शिल्लक आहेत. दुसरीकडे शिवाजीनगरच्या जम्बो कोरोना केंद्राचा विचार केला तर येथे एकूण 425 खाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑक्सिजन विरहित आयसोलेशन खाटांची संख्या 75 इतकी आहे. ऑक्सिजन खाटांची संख्या 300 आहे. व्हेंटिलेटर नसलेले अतिदक्षता खाट 15 आहेत तर व्हेंटिलेटर असलेले अतिदक्षता खाट 35 आहेत. यातील व्हेंटिलेटर नसलेले अतिदक्षता खाट आणि व्हेंटिलेटर असलेले अतिदक्षता खाट भरले असून 50 पैकी एकही खाट शिल्लक नाही. तर 300 ऑक्सिजन खाटांपैकी सध्या 50 खाट शिल्लक आहेत आणि ऑक्सिजन विरहित अलगीकरणाचे 15 खाट शिल्लक आहेत.

पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनाची धावपळ

पुण्यातील कोव्हीड सेंटर्स आणि खाटांची व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ अपूरं पडतं आहे. त्यामुळे  शहरातील 18 छोटे मोठे दवाखाने बंद करून कर्मचारी वर्ग कोव्हीड सेंटर्सला वर्ग करण्यात आला आहे.  

दरम्यान, महापालिका करणार तातडीची आरोग्य विभागात भरती करणार असून 50 एमबीबीएस, 50 बीएमएमएस,100 नर्स, आणि 100 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करणार असून  दोन दिवसात ही भरती प्रक्रिया पार पडणार  आहे.

शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना खासगी आणि महापालिकेच्या तसेच सरकारी रुग्णालयात खाटांची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. शहरात सध्या 725 अत्यवस्थ रुग्ण आहेत. तर 3016 रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर आहेत. पुणे शहरात आजपर्यंत 5 हजार 270 मृत्यू झालेले आहेत. शहरातील रुग्णालयात सध्या 15 हजार 381 खाट कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहेत. यातील 3 हजार 779 बेड सध्या उपलब्ध आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *